मराठा समाजाला आरक्षण सरकारने लवकर द्यावे, यात बेईमानी करायची नाही. मी आणि मराठा समाज मैदानात नव्हतो. सरकारला जाहीरपणे सांगतो की, मराठा आरक्षण न दिल्यास मराठे पुन्हा छाताडावर बसतील असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठा आरक्षणासाठी आता पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे ते आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
पुढे बोलताना जरांगे म्हणाले की, सरकार स्थापन झाले की बैठक घेऊन लगेच सामूहिक उपोषणाची तारीख जाहीर करू. सरकार आलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आणि अभिनंदन. आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही बाजूला राहिलो, पण आरक्षणासाठी सरकारला गुडघ्यावर टेकवणारच. एका जातीवर शक्य नव्हतं म्हणून आम्ही बाजूला झालो, असे ते म्हणाले.
मराठय़ांना छेडायचं नाही
सत्ता कुणाचीही आली तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे. कोणीही मस्तीत राहायचे नाही, हुरळून जायचे नाही. मराठय़ांना छेडण्याचे काम करायचे नाही. मी निवडणुकीत सांगितले होते. मराठा समाज मालक आहे. योग्य लोक निवडा, मी मराठा मुक्त केला होता. कोणाच्याही दावणीला बांधला नव्हता, असेही जरांगे म्हणाले.
महिनाभरात मराठय़ांची ताकद कळेल
मराठय़ांशिवाय राज्यात कोणाची सत्ता येऊ शकत नाही. काल देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठय़ांची विभागणी होऊ शकत नाही. मनोज जरांगे पाटील फॅक्टर लोकसभेला चालला तसा या विधानसभेला चालला नाही या प्रश्नावर जरांगे पाटील म्हणाले की, मी विधानसभेच्या रिंगणात नव्हतोच तर माझा फॅक्टर कसा चालणार? मी मैदानात नसताना फॅक्टर फेल कसा झाला? कशाचा अभ्यास करता तुम्ही? जरांगे फॅक्टरचा अभ्यास करायला तुमची हयात जाईल. एक महिनाभर थांबा तुम्हाला मराठय़ांची ताकद कळेल.
सरकार मराठय़ांच्या ताकदीवर
काही लोकांनी पहाटे तीन वाजेपर्यंत सभा घेतल्या. पण त्याचा काहीही फायदा झाला नाही, असा निशाणा छगन भुजबळांनी जरांगेंवर साधला.यावर तुला सांत्वन भेटी कळतात की नाही, मी राज्यात कुठे गेलो का? आलेले सरकार मराठय़ांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही मैदानात पाहिजे होतो तेव्हा दाखवला असता कचका आमच्या पॅर्टनचा, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा इशारा दिला आहे.
मैदानात असतो तर…
या निवडणुकीत मराठय़ांचे 204 आमदार झाले आहेत. मराठय़ांच्या मतांशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही, आम्ही मैदानात असतो तर एकशिक्का काम केले असते. आता आंदोलन पुकारू द्या, सगळे एका बाजूला दिसतील. आंदोलन आणि जातीची अस्मिता हा वेगळा विषय आहे असे ते म्हणाले.