कमळाबाई ‘लाडका भाई’ योजना बंद करणार! मिंधेंची खुर्ची जाणार, आता भाजपचा मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीत महायुतीमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱया भारतीय जनता पक्षाचा डोळा आता मुख्यमंत्री पदावर आहे. एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळावी अशी मिंधे गटाच्या आमदारांची इच्छा आहे. परंतु कमळाबाईने ‘लाडका भाई’ योजना बंद करण्याचे ठरवले आहे. दुसरीकडे अजित पवार गटाचे आमदार मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे मिंधेंची खुर्ची जाऊन भाजपचा मुख्यमंत्री येणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. निवडणूक आयोगानेही विजयी उमेदवारांची यादी आज राज्यपालांना सादर केल्याने मंगळवारी शपथविधी होऊ शकतो. त्याच पार्श्वभूमीवर आज फडणवीस-शिंदे-अजितदादांनी दिल्ली गाठून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पेंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.

विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीमधील भाजपने 132, मिंधे गट 57, अजित पवार गटाने 41 तर अन्य पक्षांनी 6 जागा जिंकल्या. एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचाही मुख्यमंत्री पदावर डोळा आहे. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री पदावर निर्णय होईल असे सांगण्यात येत असले तरी भाजप आता मुख्यमंत्री पद सोडण्यास तयार नाही आणि भाजपचाच मुख्यमंत्री व्हावा असा भाजप आमदारांचा आग्रह आहे.

विजयी उमेदवारांची यादी राज्यपालांना सादर

केंद्रीय निवडणूक आयोगाचे उप-मुख्य आयुक्त हिरदेश कुमार व राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या जाहीर झालेल्या निकालाची अधिसूचना, निवडून आलेल्या उमेदवारांची यादी आणि त्यासंदर्भातील राजपत्राची प्रत राज्यपालांना सादर करण्यात आली.

फॉर्म्युला तोच… मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री

महायुतीमध्ये तीन प्रमुख पक्ष असल्याने नव्या सरकारचा फॉर्म्युला काय असणार यावरही चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असाच फॉर्म्युला कायम ठेवला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मंत्रीपदाच्या बाबतीत प्रत्येक सहा आमदारांमागे एक मंत्रीपद असे ठरवले गेल्याचीही माहिती मिळाली आहे. अर्थातच उपमुख्यमंत्र्यांना गृह, अर्थ, महसूल किंवा नगरविकास अशी महत्त्वाची खाती दिली जाणार आहेत.

मिंधे आणि दादांची गोची

मिंधे गट आणि अजित पवार गट हे भाजपच्या कपटनीतीमुळेच तरले आहेत. तरीही दोन्ही गटांचा मुख्यमंत्री पदावर डोळा आहे. त्यासाठी बिहार फॉर्म्युल्याचा दाखला दिला जात आहे. परंतु भाजपने आता वेगळाच डाव टाकला आहे. इतर पक्षांमधील 20 आमदार आमच्याकडे येण्याच्या तयारीत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे मिंधे आणि अजितदादांची गोची झाली आहे. भाजपमध्ये आणखी 20 आमदार आले तर भाजपचे संपूर्ण बहुमत होऊन आपले काहीच चालणार नाही या भीतीने मिंधे गट आणि अजित पवार गटासमोर भाजपला पाठिंबा देण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.

अजित पवार यांची गटनेतेपदी निवड

अजित पवार गटाची आज बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची सर्वानुमते गटनेतेपदी निवड करण्यात आली. अजित पवार गटाने या निवडणुकीत 53 ठिकाणी उमेदवार दिले होते. त्यापैकी 41 उमेदवारांचा विजय झाला आहे. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर विजयी आमदारांची बैठक झाली. त्यात अजित पवार यांच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

दादा गट फडणवीसांना पाठिंबा देणार

अजित पवार गटाचे आमदार मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार गटाला मिळालेल्या अनपेक्षित यशामागे अमित शहा यांची कूटनीती आणि फडणवीस यांची कारस्थाने यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे शहांच्या इच्छेविरुद्ध न जाता फडणवीसांना पाठिंबा देण्यातच आपले हित असल्याचे या आमदारांचे मत आहे.