भाजप हरयाणा जिंकला, कश्मीर हरला, महाराष्ट्र-झारखंडमध्ये तसेच घडले; ईव्हीएमवर संशय नको म्हणून असे निकाल लावले जातात का? शरद पवार यांनी घेतली शंका

ईव्हीएमवर संशय नको म्हणून असे निकाल लावले जातात का, अशी शंका आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि झारखंडच्या निकालानंतर राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेच्या आधारे घेतली. एक लहानसे राज्य विरोधकांसाठी सोडून द्यायचे आणि मोठे राज्य सत्ताधाऱयांसाठी ठेवायचे असा एक ट्रेंड दिसतो. म्हणजे उद्या कोणी ईव्हीएमसंदर्भात आक्षेप घेतल्यास, इथे तुम्ही आक्षेप घेता, पण त्या राज्यात तुमचे राज्य आले ना, असा युक्तिवाद करता येतो असेही पवार यांनी नमूद केले. भाजप हरयाणा जिंकला आणि जम्मू-कश्मीर हरला. महाराष्ट्र आणि झारखंडच्या निवडणुकीतही तसेच घडले याकडेही शरद पवार यांनी लक्ष वेधले.

निवडणूक निकालानंतर दुसऱयाच दिवशी शरद पवार पुन्हा मैदानात उतरले आहेत. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांची उद्या पुण्यतिथी आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करण्यासाठी शरद पवार आजच कराड मुक्कामी आले आहेत. त्यावेळी पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले, विधानसभा निवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे नसला तरी हा लोकांनी दिलेला निर्णय आहे. येत्या दोन दिवसांत निवडून आलेल्या आमदारांची, प्रमुख नेत्यांची बैठक होणार असून, त्यात पराभवाची कारणमीमांसा करण्यात येईल. लोकांनी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करू. बारामतीत अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही. अजित पवारांना यश मिळाले हे मान्य करण्यात गैर नाही असे शरद पवार यांनी या प्रश्नावर सांगितले.

अजित पवार आणि युगेंद्रची तुलना होऊ शकत नाही

बारामतीच्या निकालावरही पवारांनी भाष्य केले. ते म्हणाले ‘बारामतीमधून कोणालातरी उभं करणं गरजेचं होतं. कोणाला उभं केलं नसतं तर महाराष्ट्रात काय संदेश गेला असता? आम्हाला माहीत आहे की अजित पवारांची युगेंद्रशी तुलना होऊ शकत नाही. अजित पवारांनी येथे बरीच वर्षे काम केलं आहे. सत्तेतील साथ हे एका बाजूला आणि नवखा तरूण उमेदवार एका बाजूला, त्यामुळे याची तुलना होऊ शकत नाही.’
ईव्हीएमबाबत पवार नेमकं काय म्हणाले…

झारखंडमध्ये हेमंत सोरेन तपास यंत्रणांच्या निशाण्यावर होते. त्यांना त्रास दिला गेला तरीही तिथे त्यांचा विजय झाला. हे कसं, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता आजच मला तिकडच्या काही सहकाऱयांचा फोन आला होता. या निकालांना आणखी एक अँगल आहे, असे ते सांगत होते. अलीकडेच हरयाणा आणि जम्मू-कश्मीरची निवडणूक झाली. त्यात जम्मू-कश्मीरमध्ये भाजपविरोधात आम्हाला यश मिळाले तर हरयाणात भाजप जिंकला. त्यानंतर ही आपली निवडणूक झाली. आपल्याकडे महाराष्ट्रात ठरलेल्या मुदतीपेक्षा निवडणुकीला एक महिना उशीर केला. महराष्ट्राची निवडणूक झारखंडबरोबर घेण्यात आली. तिथे झारखंड मुक्ती मोर्चा-काँग्रेसला यश मिळाले तर महाराष्ट्रात अपयश आले. त्यामुळे एक लहानसे राज्य अपयशासाठी आणि मोठे राज्य सत्ताधाऱयांच्या नावे, असा काहीतरी वेगळा खेळ दिसतो. म्हणजे उद्या युक्तिवाद करायला मोकळे की मशीनबाबत तुम्ही आक्षेप घेता तर मग त्या राज्यात तुमचं सरकार कसं आलं. तिथे हेच मशीन होतं, असे नमूद करत शरद पवारांनी शंका उपस्थित केली. मला काय म्हणायचं आहे हे तुमच्या लक्षात आलं ना, अशी विचारणाही पवारांनी पत्रकारांना केली. ईव्हीएमबाबत काही सहकाऱयांचं मत मी ऐकलं. पण त्याची ऑथेंटिक माहिती माझ्याकडे येत नाही तोपर्यंत मी त्यावर भाष्य करणार नाही, असेही शरद पवार यांनी पुढे नमूद केले. पैशाचा वापर आतापर्यंत असा कधी पहायला मिळाला नाही. यापूर्वी कधी झालं नाही इतकं पैशाचं वाटप झालं असं लोक सांगतात, असेही शरद पवार म्हणाले.

z भाजपने अदानींच्या फायद्यासाठीच महाराष्ट्रासारखे मोठे राज्य ईव्हीएमचा गैरवापर करून जिंकले, या निवडणुकीत अदानींचा पैसा वापरला गेला असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही केल होता असे पत्रकारांनी यावेळी सांगितले असता, त्याबद्दल आपल्याला काही माहिती नाही, राहुल गांधींकडेच ती माहिती असेल, असे शरद पवार म्हणाले.

‘लाडकी बहीण’ योजनेविषयी भीती दाखवली

‘लाडकी बहीण’ योजना ही केवळ निवडणुकीसाठी होती. तसेच आम्ही सत्तेत असलो तर ही योजना सुरू राहील. महाविकास आघाडी सत्तेत आली तर ही योजना बंद करेल अशी भीती सत्ताधाऱयांनी प्रचारसभांमधून दाखवली. त्याचाही परिणाम मतदानावर झाला, असे शरद पवार म्हणाले.

‘बटेंगे तो कटेंगे’ नाऱयामुळे मतांचे धुवीकरण झाले

‘बटेंगे तो कटेंगे’ अशा घोषणांमुळे राज्यात मतांचे ध्रुवीकरण झाल्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली. निवडणुकीत कुठे ना कुठेतरी धार्मिक अँगल आहे असे लोक सांगतात. व्होट जिहाद ही जी भूमिका मांडली, त्यातून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न झालेला दिसतो. या प्रयत्नाला यश आले हे नाकारता येत नाही असे ते म्हणाले.

घरी बसणार नाही… पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार

महाराष्ट्रात सगळ्या जिल्हय़ात फिरलो. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी, पदाधिकाऱयांनी मेहनत घेतली. परंतु हवा तसा निकाल समोर आला नाही. हे निकाल अनपेक्षित आहेत. लोकांनी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करू. परंतु आम्ही घरी बसणार नाही. नव्या जोमाने, उत्साहाने लढणार. कर्तृत्ववान नवी पिढी तयार करणार, असा निर्धार शरद पवार यांनी केला.