सिंधी निर्वासितांच्या इमारतींचा पुनर्विकास मार्गी लागणार, म्हाडा निविदा प्रक्रिया राबवणार

पुनर्विकासाला आक्षेप घेणाऱया विकासकाची याचिका फेटाळल्यामुळे शीव-कोळीवाडा येथील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे. या इमारतींच्या पुनर्विकासासाठी म्हाडा खासगी विकासकाची नियुक्ती करणार असून निविदा काढणार आहे.

शीव-कोळीवाडा परिसरातील जीटीबीनगर येथील सिंधी निर्वासितांच्या 25 इमारतींची दुरवस्था झाल्याने या इमारतींना मुंबई महापालिकेने अतिधोकादायक घोषित केले. त्यानंतर या इमारती रिकाम्या करण्यात आल्या. राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून या इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. तसा जीआरही काढला होता, मात्र एका विकासकाने त्यावर आक्षेप घेत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यामुळे पुनर्विकास रखडला. या इमारतींच्या पुनर्विकासावरून वाद सुरू झाल्यामुळे म्हाडाकडून सुरू केलेली निविदा प्रक्रिया रखडली, मात्र आता न्यायालयाने विकासकाची याचिका फेटाळल्याने म्हाडा लवकरच या 25 इमारतींच्या पुनर्विकासाबाबत निविदा प्रक्रिया राबवणार आहे.