महाभारताची आठवण करून देण्याची गरज नव्हती, हायकोर्टाने सत्र न्यायालयावर व्यक्त केला संताप

फाशीची शिक्षा ठोठावताना महाभारताची आठवण करून देण्याची काहीच गरज नव्हती, असा संताप उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयावर व्यक्त केला.

प्रत्येक घटना व आरोपींचा गुन्हा हा वेगवेगळा असतो. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्रात घडलेल्या गुह्यांचा संदर्भ देऊन हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. पुराव्यांवर सत्र न्यायालयाने काहीच भाष्य केलेले नाही, असा ठपकाही न्या. विनय जोशी व न्या. अभय मंत्री यांच्या खंडपीठाने नागपूर येथील सत्र न्यायालयावर ठेवला.

एकाची सुटका, दोघांना जन्मठेप

हे हत्या प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ नाही, असे स्पष्ट करत खंडपीठाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला. हरिभाऊ व त्यांचा मुलगा शामची फाशीची शिक्षा रद्द करून न्यायालयाने त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. द्वारकाबाईची फाशी खंडपीठाने रद्द केली.

जमिनीच्या वादातून हत्या

29 एकर जमिनीच्या वादातून धनराज चरहाटे व त्यांच्या दोन मुलांची हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी हरिभाऊ तळगोटे, त्यांची पत्नी द्वारकाबाई, त्यांचा मुलगा शामला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली. ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना आहे, असा निष्कर्ष सत्र न्यायालयाने काढला. निकाल देताना महाभारताचाही संदर्भ दिला. त्याविरोधात त्यांनी अपील याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने मंजूर केली.