एकाच घरातील दोन व्यक्ती रिंगणात उतरल्या…कुणी जिंकले तर कुणाला पराभवाचे तोंड पहावे लागले. यंदाच्या विधानसभेत 19 भाऊ मैदानात उतरले होते. त्यातील 11 जणांनी मैदान मारले तर 8 जण पराभूत झाले.
मुंबईत शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघातून, त्यांचे मावस बंधू व शिवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी वांद्रे पूर्व मतदारसंघातून तर चुलत बंधू अमित ठाकरे यांनी माहीम मतदारसंघातून निवडणूक लढवली. आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई यांचा दणदणीत विजय झाला. अमित ठाकरे यांचा मात्र पराभव झाला. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी वांद्रे पश्चिममधून निवडणूक लढवत पुन्हा एकदा विधानसभा गाठली. त्यांचे बंधू विनोद शेलार यांनी मालाड मतदारसंघातून नशिब आजमावले, परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. पवार घराण्यातील रोहित पवार हे कर्जत जामखेड तर युगेंद्र पवार बारामतीमधून निवडणुकीला उभे होते. रोहित पवार यांनी भाजपच्या राम शिंदे यांना धूळ चारली. लातूरच्या शहर आणि ग्रामीण अशा दोन मतदारसंघात अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे सख्खे बंधू निवडणूक रिंगणात होते. अमित देशमुख यांनी बाजी मारली मात्र धीरज देशमुख यांना पराभव पत्करावा लागला.