लोकल तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांमध्ये निष्कारण साखळी खेचणाऱयांची (चेन पुलिंग) यापुढे खैर नाही. रेल्वे प्रवासाचे वेळापत्रक कोलमडण्यास कारणीभूत ठरणाऱया अशा प्रकारांविरोधात मध्य रेल्वेने कठोर कारवाईला सुरुवात केली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने शनिवारी एका दिवसात अशा गुह्यांत नऊ जणांविरोधात खटला दाखल केला.
मुंबईच्या उपनगरी लोकल मार्गावर अलीकडच्या काही महिन्यांत गुन्हेगारी वाढली आहे. मध्य रेल्वे मार्गावर चोरी, हाणामारी, लोकलवर दगड फेकणे हे प्रकार अधूनमधून घडत आहेत. त्यातच निष्कारण ट्रेनची साखळी खेचून गाडय़ा थांबवण्याचे प्रकार वाढले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने कठोर पावले उचलली आहेत. काही प्रवासी कुठलेही कारण नसताना साखळी खेचतात, तर काही प्रवासी किरकोळ कारणांवरूनही साखळी खेचून गाडी थांबवतात. विशेषतः हाणामारीच्या घटनेवेळी असे प्रकार जास्त घडतात. त्यामुळे त्या लाईनवरील इतर गाडय़ांचेही वेळापत्रक कोलमडते. या पार्श्वभूमीवर आम्ही कठोर कारवाईला सुरुवात केल्याची माहिती मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने दिली. शनिवारी 9 प्रवाशांविरोधात याच कारणावरून रेल्वे कायद्याच्या कलम 141 अन्वये खटला दाखल केला आहे. कारवाईची मोहीम आणखी तीव्र केली जाणार आहे, असे स्पष्ट करीत रेल्वे अधिकाऱयांनी प्रवाशांना ‘अलार्म चेन पुलिंग’ या सुरक्षात्मक उपायाचा गैरवापर न करण्याचे आवाहन केले आहे.
चालू वर्षातील साखळी खेचण्याच्या घटना
- एप्रिल 169
- मे 131
- जून 129
- जुलै 146
- ऑगस्ट 122
- सप्टेंबर 126
(सहा महिन्यांत 823 घटनांची नोंद)
एक वर्षाचा तुरुंगवास व दंडाची शिक्षा होऊ शकते
ट्रेनमध्ये साखळी खेचणायांविरोधात रेल्वे कायद्याच्या कलम 141 अन्वये खटला चालवला जात आहे. या कलमाअंतर्गत गुन्हा सिद्ध झाल्यास आरोपी प्रवाशाला एक वर्षाचा तुरुंगवास तसेच एक हजार रुपयांच्या दंडाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यानुसार उपद्रवी प्रवाशांविरुद्ध खटले दाखल केले जात आहेत. त्यामुळे निष्कारण साखळी खेचणाऱयांची थेट तुरुंगात रवानगी होऊ शकणार आहे.