हिंदुस्थानने नाकारले 300 अब्ज डॉलरचे क्लायमेट पॅकेज

हिंदुस्थानने अजरबैजानची राजधानी येथे आयोजित 29 व्या कॉन्फरन्स  ऑफ पार्टीजमध्ये विकसनशील देशांच्या मदतीसाठीचे 300 अब्ज डॉलरचे क्लायमेट पॅकेज नाकारले. ही रक्कम विकसनशील देशांच्या गरजांच्या तुलनेत खुपच कमी आहे. तसेच विकसित देश जबाबदाऱया निभावण्यासाठी इच्छुक नसल्याचेच यातून समोर येत आहे, असा आरोप हिंदुस्थानी शिष्टमंडळाच्या वतीने बाजू मांडताना चांदनी रैना यांनी केला.

काय म्हणाला हिंदुस्थान?

चांदनी रैना यांनी बैठकीच्या सांगता सत्रात आपली मते मांडली. इतक्या कमी पॅकेजच्या माध्यमातून येणाऱया सर्वात मोठय़ा आव्हानाचा सामना करता येणार नाही. त्यामुळे आम्ही हे पॅकेज नाकारतो. 300 अब्ज डॉलरचे पॅकेज विकसनशील देशांच्या गरजा पूर्ण करू शकत नाही, असे रैना म्हणाल्या.

विकसनशील देश वातावरण बदलाचा सर्वाधिक सामना करत आहेत. परंतु, विकास कमी करून कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी या देशांवर दबाव टाकला जात आहे. हे लक्षात घेता विकसनशील देशांना विकसित देशांनी तयार केलेल्या एकतर्फी कार्बन बॉर्डर अॅडजेस्टमेंट मॅकेनिझमशीदेखील लढावे लागत आहे, असे रैना म्हणाल्या. इतक्या कमी आर्थिक मदतीमुळे आम्ही प्रचंड निराश झालो आहोत. हे पॅकेज म्हणजे निव्वळ नजरेचा धोका आहे, अशा शब्दांत चांदनी रैना यांनी क्लायमेट पॅकेजबद्दल नाराजी व्यक्त केली.