राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील विधानसभेचे निकालांवर मत व्यक्त केले. तसेच या निकालांचा आणि परिस्थितीचा अभ्यास करणार असल्याचे सांगितले. हे निकाल आमच्या अपेक्षेप्रमाणे लागले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्या अपेक्षेप्रमाणे निवडणूक निकाल नाहीत. मात्र, हा जनतेने दिलेला निकाल आहे. आता या निकालाचे परीक्षण करण्यात येणार आहेत,या निकालामागची कारणे शोधावी लागतील. आम्ही अनेक वर्षांपासून सार्वजनिक जीवनात आहोत, अशी परिस्थिती आम्ही याआधी पाहिली नाही, त्यामुळे परिस्थितीचाही अभ्यास करावा लागणार आहे. आता आम्ही जोमाने काम करत जनतेत पुन्हा जाणार आहोत.
आता शरद पवार यांनी निवृत्त व्हावे, अशी टीका विरोधक करत आहेत. त्याबाबत विचारले असता शरद पवार म्हणाले की, मी काय करावे याचा निर्णय मी आणि माझे पक्षातील सहकारी घेतली. याबाबत कोणीही सल्ला देण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी दिले. सध्याच्या आकडेवारीवरून महिलांची मतदानाची टक्केवारी वाढली आहे. तसेच त्यांनी लाडकी बहीण योजनेचा प्रचारही केला होता. त्याचा परिणाम झाल्याची शक्यताही त्यांनी वर्तवली. तसेच सत्ता दिली नाही, तर योजना बंद होईल, असा अपप्रचारही त्यांच्याकडून करण्यात आला, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या या अपप्रचारामुळे आमची मतं कमी झाली, असेही शरद पवार यांनी सांगितले.
लोकसभेला महाराष्ट्रात दिसलेल्या निकालामुळे आम्हांला आत्मविश्वास होता. त्यामुळे आम्ही प्रचारात कमी पडलो काय, याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. ईव्हीएम मशीनवरही टीका करण्यात येत आहे. मात्र, त्याबाबत विश्वासार्ह माहिती मिळाल्याशिवाय आपण मत व्यक्त करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच या निवडणुकीत याआधी झाला नव्हता, एवढा पैशांचा गैरवापर झाल्याचेही दिसून येत आहे.
आमच्या नेत्यांनी, सहकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहमत घेतली. मात्र, आमच्या अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. धर्माच्या राजकारणामुळे निकाल बदलल्याची शक्यताही दिसत आहे. बटेंगे तो कटेंगे या धोरणामुळे मतांचा ध्रुवीकरण झाल्याचे दिसून येत आहे. तसेच मराठा आणि ओबीसी मतांबाबतचा अभ्यासही करण्यात येणार आहे. बारामतीमधील निकालाबाबत ते म्हणाले की, युगेंद्र आणि अजित पवार यांची तुलना होऊ शकत नाही. मात्र, बारामतीत कोणालतरी लढावेच लागणार होते. त्यांच्यात चुरशीची लढत झाली. तसेच या निकालाची कल्पना होती, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे निकाल अनपेक्षित असले तरी आम्ही हताश होत घरी बसणारे नाही. आम्ही नव्या उत्साहाने जोमाने, उत्साहाने कामाला लागू आणि जनतेत जाऊ, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच पुन्हा एखदा कतृत्ववान पिढी तयार करणार आहोत. आमच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या त्यानंतर सर्व नेत्यांची बैठक मंगळवारी होणार आहे. राज्यात विरोध पक्षनेता असणे राजकारणासाठी आणि राज्यासाठी चांगले असते. मात्र, विरोधी पक्षनेत्यांसाठी आवश्यक असणारे संख्याबळ विरोधकांकडे नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.
अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे लगेचच त्यांच्याकडून कोणत्याही अपेक्षा व्यक्त करणे योग्य नाही. मात्र, त्यांनी सत्तेवर येण्यासाठी जी आश्वासने दिली, ती पूर्ण होण्याची जनता आता वाट बघत आहे, असेही शरद पवार म्हणाले.