पाकिस्तानमध्ये सुन्नी-शिया समुदायांमध्ये हिंसक संघर्ष; 82 लोकांचा मृत्यू, 156 जखमी

पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागात गेल्या तीन दिवसांपासून सुन्नी आणि शिया समुदायांमध्ये भीषण जातीय संघर्ष सुरू आहे. दोन्ही बाजूंकडून गोळीबार, दगडफेक आणि जाळपोळीत आतापर्यंत 82 जणांचा मृत्यू झाला असून 156 हून अधिक जण जखमी झाले आहेत. खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कुर्रम जिल्ह्यातील एका स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर वृत्तसंस्था एएफपीला सांगितले की, मृतांपैकी 16 सुन्नी होते, तर 66 शिया समुदायाचे होते.

पाकिस्तान हा सुन्नी बहुसंख्य देश आहे. मात्र अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या कुर्रम जिल्ह्यात शियाबहुल लोकसंख्या आहे. या दोन समुदायांमध्ये अनेक दशकांपासून संघर्ष सुरू आहे. येथे गुरुवारी हिंसाचाराला सुरुवात झाली. मिळालेल्या माहितीनुसार, शिया मुस्लिमांच्या दोन वेगवेगळ्या ताफ्यांवर पोलीस एस्कॉर्टमध्ये हल्ला करण्यात आला. ज्यात 43 लोक ठार झाले. यानंतर दोन दिवस गोळीबार सुरु होता.

कुर्रम जिल्ह्यातून 23 नोव्हेंबर रोजी सुमारे 300 कुटुंबांना पलायन करण्यास भाग पाडले गेले. कारण रात्रीपर्यंत येथे गोळीबार सुरू होता. कुर्रममध्ये मोबाईल नेटवर्क बंद करण्यात आले आहे आणि मुख्य महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे, असे स्थानिक प्रशासनाच्या अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले. कुर्रममधील हिंसाचार रोखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे.