मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार; मनोज जरांगे यांचा पुन्हा इशारा

लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामुळे महायुतीला मोठा फटका बसला होता. आता विधानसभेचे निकाल अनपेक्षित आल्याने याबाबत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच महायुती सरकारला आरक्षणाबाबत पुन्हा एखदा इशारा दिला आहे. विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणणाऱ्यांना त्यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही मैदानातच उतरलो नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणताय? असा सवाल त्यांनी केला आहे. आता सरकारने मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार, असा इशारा नव्या सरकारला मनोज जरांगेंनी दिला.

विधानसभेत मनोज जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणणाऱ्यांना मनोज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. कोणत्या घटकानं श्रेय घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानातच नाही आणि तुम्ही म्हणता जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणता. आम्ही मैदानात नाही. कोण निवडणून आलं कोण पडलं याचं आम्हाला सोयरसुतक नाही. जेवढे निवडून आलेत ते सगळे मराठा फॅक्टरमुळंच आले असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. मराठा फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर हे सगळं कळायला तुमची हयात जाईल, असा टोलाही त्यांनी लगावला.

मराठ्यांशी बेईमानी कराल तर मराठ्यांना कोणाचंच सरकार रोखू शकत नाही. गावातल्या रडक्या पोरांसारखं झालंय हे. घरात नसलं की ते जसं रडतं तसं आम्ही मैदानातच नव्हतो. असं म्हणत जरांगेंनी नव्या सरकारला खडसावलं.