कोल्हापूरात महाविकास आघाडी पोस्टलमध्ये जिंकली ; ईव्हीएम मध्ये हरली ? सर्वत्र उलटसुलट चर्चांना ऊत

>> शीतल धनवडे

राज्यात मतदानाच्या टक्केवारीत यंदाही आघाडीवर राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचा निकाल अत्यंत धक्कादायक लागला. या दहाही जागावर ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीत महायुती आणि त्यांचे मित्र पक्ष मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.पण पोस्टल मतदानात मात्र महायुतीचा सरळ सरळ पराभव झाल्याचे दिसून येत आहे. पोस्टल मतदानात राधानगरी व इचलकरंजी मतदारसंघ वगळता महाविकास आघाडीचे उमेदवारांनीच बाजी मारल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे.

दरम्यान जिल्ह्यात दहा विधानसभा मतदार संघात लागलेल्या या धक्कादायक निकालाची आता सर्वत्र उलट सुलट चर्चा होऊ लागली असून,बहुतांश ठिकाणी हा निकाल अनपेक्षित असल्याची चर्चा होताना दिसत आहे. ईव्हीएम मशीन मध्ये मतमोजणीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या फरकाचे लीड मिळाले असले तरी पोस्टल मतदानात मिळालेले आकडेवारी पाहिल्यास त्यांचा एक प्रकारे पराभव झाल्याचेच चित्र आहे.

चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजपचे बंडखोर व अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील हे जरी विजयी झाले असले तरी पोस्टल मध्ये त्यांना 601 मते मिळाली आहेत.अजित पवार गटाचे आमदार राजेश पाटील यांना 645 तर राष्ट्रवादी,शरदचंद्र पवार पक्षाच्या नंदाताई बाभुळकर यांना सर्वाधिक 772 पोस्टल मते मिळाली आहेत.

कागल विधानसभा मतदारसंघात विजयी अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांना 1 हजार 441 पोस्टल मते मिळाली आहेत.तर राष्ट्रवादी शरच्चंद्र पवार पक्षाचे समरजीत घाटगे यांना 1 हजार 739 पोस्टल मते मिळाली आहेत. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात विजयी भाजपचे अमल महाडिक यांना 899 तर काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना 1 हजार 606 अशी दुप्पट पोस्टल मते मिळाली आहेत.

करवीर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विजयी चंद्रदीप नरके यांना 983 पोस्टल मते मिळाली आहेत. तर काँग्रेसचे राहुल पी.एन.पाटील यांना 1 हजार 483 पोस्टल मते मिळाली आहेत. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विजयी उमेदवार राजेश क्षीरसागर यांना 615 पोस्टल मते मिळाली आहेत.तर महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांना त्यांच्यापेक्षा जास्त एकूण 724 पोस्टल मते मिळाली आहेत.

शाहुवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सत्यजित पाटील-सरूडकर यांना 1 हजार 44 तर जनसुराज्यचे विजयी आमदार विनय कोरे यांना 1 हजार 250 पोस्टल मते मिळाली आहेत. हातकणंगले विधानसभा मतदारसंघात जनसुराज्य पक्षाचे विजयी उमेदवार अशोक माने यांना 564 तर पराभूत झालेले काँग्रेसचे आमदार राजू आवळे यांना 643 पोस्टल मते मिळाली आहेत. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद शरदचंद्र पवार पक्षाचे मदन कारंडे यांना 479 तर भाजपचे विजयी राहुल आवाडे यांना जवळपास 497 पोस्टल मते मिळाली आहेत.

राधानगरी/भुदरगड विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे विजयी आमदार प्रकाश आबिटकर यांना पोस्टल मध्ये 1 हजार 671 तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे के.पी.पाटील यांना 1 हजार 434 व अपक्ष ए. वाय.पाटील यांना 214 मते मिळाली आहेत. शिवाय शिरोळ विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे पराभूत उमेदवार गणपतराव पाटील यांना 972 पोस्टल मते मिळाली आहेत.तर येथे विजयी झालेले आमदार राजेंद्र पाटील -यड्रावकर यांना 899 एवढे कमी पोस्टल मतदान झालेले आहे.