पैसा जिंकला, निष्ठा हरली ! ठाणे, पालघर, रायगडात धक्कादायक निकाल

महागाईचा भस्मासुर, महिलांवरील वाढते अत्याचार आणि राज्याच्या हक्काचे प्रकल्प गुजरातच्या घशात घालणाऱ्या खोकेबाज महायुतीचा पुन्हा एकदा अनपेक्षित विजय झाला. लोकसभा निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतर विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच विजयाची पताका फडकवेल, असा माहोल सर्वत्र होता. त्यामुळे हादरलेल्या भाजप-मिंध्यांनी या निवडणुकीत अक्षरशः पाण्यासारखा पैसा वाटल्याची चर्चा होती. ठिकठिकाणी नाकाबंदीत कोट्यवधी रूपयांचे घबाड पकडण्यात आले. तोच निकाल आज मतपेटीतून बाहेर आला. ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील 31 विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपला 14, मिंधे गटाला 12, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 2 तर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांचा कळवा-मुंब्यातून दणदणीत विजय झाला आहे. भिवंडीत समाजवादी पार्टीचे रईस शेख तसेच डहाणूतही माकप-महाविकास आघाडीचे विनोद निकोले यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. महायुतीच्या अनाकलनीय विजयाने सर्वसामान्य जनतेला धक्काच बसला आहे. पैसा जिंकला आणि महाराष्ट्रप्रेमींची निष्ठा हरली असेच मत सर्वत्र व्यक्त होत आहे.

शेकापच्या दगाबाजीमुळे पेण, पनवेल, उरणमध्ये भाजपचा विजय

महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून चित्रलेखा पाटील यांना अलिबागमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जाहीर पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर अलिबाग मतदारसंघातील शिवसैनिकांनी एकदिलाने शेकापचे काम केले. असे असताना शेतकरी कामगार पक्षाने पेणमधून अतुल म्हात्रे, पनवेलमधून बाळाराम पाटील व उरणमधून प्रीतम म्हात्रे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. महाविकास आघाडीचा धर्म जयंत पाटील यांनी पाळला नाही. त्यामुळे पेणमध्ये शिवसेनेचे प्रसाद भोईर, पनवेलमध्ये लिना गरड व उरणमध्ये मनोहर भोईर यांचा पराजय होऊन अनुक्रमे भाजपचे उमेदवार रवींद्र पाटील, महेश बालदी व प्रशांत ठाकूर यांचा विजय झाला. शेकापच्या दगाबाजीमुळेच भाजपचा विजय सुकर झाल्याची टीका रायगडकरांनी केली आहे.

कर्जतमध्ये थोरवेंना घाम फुटला

सत्ता आणि पैशाच्या जोरावर मिंधे गटाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी सुरुवातीपासूनच आपला विजय पक्का, अशा फुशारक्या मारल्या होत्या. प्रत्यक्षात शेवटच्या फेरीपर्यंत त्यांना घाम फुटला होता. थोरवे यांना 94 हजार 511 तर अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांना 88 हजार 750 मते मिळाली, तर शिवसेना महाविकास आघाडीचे नितीन सावंत यांनी 48 हजार 736 मते मिळवत कडवी झुंज दिली. त्यामुळे अटीतटीच्या ठरलेल्या या मतदारसंघात थोरवे यांचा निसटता विजय झाला.

श्रीवर्धनमध्ये अदिती तटकरे यांचा विजय

श्रीवर्धन मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या अदिती तटकरे यांचा 82 हजार 742 इतक्या मताधिक्याने विजय झाला आहे. त्यांना 1 लाख 15 हजार 896 इतकी मते मिळाली आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल नवगणे यांना 33 हजार 154 मते मिळाली आहेत.

अपक्ष उमेदवारामुळे अलिबागमध्ये अटीतटीची लढत

अलिबागमध्ये मिंधे गटाकडून महेंद्र दळवी तर शेकापच्या चित्रलेखा पाटील रिंगणात होत्या. या दोघांमध्येच खरी लढत होईल असे चित्र होते. मात्र भाजपने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने दिलीप भोईर यांनी अपक्ष अर्ज दाखल करत शड्डू ठोकला. भोईर हे मूळचे शेकापचेच होते. त्यांनी दीड-दोन वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभा निवडणुकीची तयारी केली होती. त्यांनी 33 हजार 210 मते मिळवल्याने ही निवडणूक अटीतटीची झाली. भोईर हे शेकापमध्ये असते तर या मतदारसंघातील निकाल वेगळा लागला असता अशी चर्चा आहे. दरम्यान, महेंद्र दळवी यांना 1 लाख 13 हजार 599, चित्रलेखा पाटील यांना 84 हजार 34 मिळाली आहेत. दळवी यांचा 29 हजार 565 मतांनी विजय झाला आहे.