भायखळय़ात गद्दारीविरुद्ध मशाल धगधगली, मनोज जामसुतकर यांचा विक्रमी विजय

भायखळा विधानसभा मतदारसंघात गद्दारीविरुद्ध शिवसेनेची मशाल धगधगली. भायखळय़ातील जनतेने शिवसेनेशी गद्दारी केलेल्या यामिनी जाधव यांना पराभूत करून महाविकास आघाडीचे उमेदवार मनोज जामसुतकर यांच्या शिरपेचात विजयाचा तुरा रोवला. जामसुतकर यांचा विक्रमी मतांनी विजय झाला.

मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा पहिल्या फेरीतच आघाडी मिळाल्याने यामिनी जाधव हुरळून गेल्या होत्या. मात्र दुसऱ्या फेरीपासून जामसुतकर यांनी जी आघाडी घेतली, ती विजयाचे शिक्कामोर्तब होईपर्यंत. भायखळा मतदारसंघात ईव्हीएमवर एकूण 1 लाख 37 हजार 244 इतके मतदान झाले. त्यातील जवळपास 58 टक्के म्हणजे 79 हजार 769 मते जामसुतकर यांना मिळाली. यामिनी जाधव यांच्या पारडय़ात फक्त 48465 मते पडली. भायखळय़ात मुस्लिम मतदारांची संख्या मोठी आहे. त्यातील बहुतांश मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करून करून मिंधे गटाचा पाडाव केला. शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेले बहुतांश गद्दार पुन्हा निवडून आले. मग यामिनी जाधव यांचा पराभव कसा झाला, अशी चर्चा भायखळय़ात सुरू आहे.