माहीमचा गड वाघाने जिंकला…; महेश सावंत ठरले जायंट किलर

माहीममधील शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार महेश सावंत यांच्या विजयाची घोषणा होताच दादर परिसरात तुफान जल्लोष झाला, फटाक्यांच्या माळा फुटल्या, हवेत गुलाल उधळला गेला, ढोल-ताशे त्वेषाने वाजू लागले. माहीमचा पारंपरिक गड राखल्यानंतर शिवसेनेच्या विजयाच्या घोषणा सुरू झाल्या. या मतदारसंघातील गद्दाराला पाडल्याचा आनंद शिवसैनिकांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. माहीमचा गड महेश सावंत राखणार याची शिवसैनिकांना खात्री होतीच म्हणून शिवसैनिकांनी खास टी-शर्ट तयार करून घेतली होती. त्याच्या मागच्या बाजूला शिवसेनेचे मशाल चिन्ह आणि ‘मातोश्रीला जो नडला त्याला आम्ही पाडला… सामान्य शिवसैनिक’ असा टी-शर्टवर संदेश दिला होता.

मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा टपाली मतदानाच्या मोजणीत मनसेचे उमेदवार आघाडीवर असल्याचे टीव्ही चॅनेलवर आघाडीचे प्लॅश झळकू लागले, पण शिवसैनिक निश्चिंत होते. प्रत्यक्षात मतमोजणी सुरू होताच महेश सावंत यांनी आघाडी घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर काही मिनिटांतच ढोल-ताशांचे पथक आले. प्रत्येक फेरीअंती महेश सावंत यांना आघाडी मिळत असल्याची घोषणा होताच शिवसैनिकांनी घोषणा देण्यास सुरुवात केली. मतमोजणीच्या प्रत्येक फेरीअखेर शिवसैनिकांची गर्दी वाढत गेली. विजयाच्या दिशेने प्रवास सुरू होताच शिवसैनिकांनी पोस्टर्स-बॅनर्स फडवण्यास सुरुवात केली. ‘गड राखला वाघाने… शिवसेना भवनावर भगवा फडकला मानाने’, ‘सुवर्ण क्षण ढाण्या वाघाची डरकाळी’, ‘मतदार राजा तूच आहे शिल्पकार’ असे बॅनर्स झकळले. काही वेळात माजी महापौर महादेव देवळे आले. उत्साही शिवसैनिकांनी त्यांना खांद्यावर उचलून घेतले. देवळे यांनी हातात भगवा झेंडा घेऊन फडकवला.

शिंदे गटाचे पराभूत उमेदवार सदा सरवणकर यांनी फेरमतमोजणीची मागणी केल्याची बातमी आली. काही वेळातच पोलिसांच्या दंगल नियंत्रण पथकाची एक बस आणि ‘वॉटर कॅनन’ असलेली गाडी आली. या पथकातील पोलीस रस्त्यावर उतरले. त्यामुळे वातावरण काहीसे तंग झाले. ढोल-ताशे वाजण्याचे बंद झाले. अखेरीस फेरमतमोजणीची मागणी फेटाळण्यात आली.