शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांचा वरळी विधानसभा मतदारसंघात दणदणीत विजय झाला. मुंबईसह संपूर्ण राज्याचे लक्ष वरळीतील लढतीकडे लागले होते. मिंधे गटाने माजी खासदार मिलिंद देवरा यांना रिंगणात उतरवले होते तर मनसेने दादरमधून संदीप देशपांडे यांना आयात करून वरळीकरांच्या माथी मारले होते. मात्र मतदारांनी आदित्य ठाकरे यांच्या बाजूने कौल देत बालेकिल्ला कायम राखला.
मतमोजणीच्या 17 फेऱ्या झाल्या. आदित्य ठाकरे यांनी अगदी टपाली मतदान मोजणीपासूनच आघाडी घेतली होती. वरळी मतदारसंघात एकूण 1924 मतदारांनी टपाली मतदान केले. त्यातील 874 मते आदित्य ठाकरे यांना मिळाली. 17 फेऱ्यांमध्ये त्यांना 62,450 इतकी मते मिळाली. म्हणजेच एकूण 63,324 मते आदित्य ठाकरे यांना मिळाली. देवरा 54,523 मते मिळाली.
वरळीत आदित्य ठाकरे यांनी विकासकामांचा धडाका लावला होता. बीडीडी चाळवासीयांचे प्रश्न, कोळीवाडय़ातील कोळी बांधवांच्या समस्या त्यांनी प्राधान्याने सोडवल्या. आपल्या कार्यातून त्यांनी लोकांची मते आणि मनेही जिंकली. या मतदारसंघाचे यापूर्वी प्रतिनिधित्व केलेले शिवसेना आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांनी केलेल्या कामांचीही त्याला जोड मिळाली आणि वरळीकरांनी आदित्य ठाकरे यांना भरभरून मतदान केले.