झारखंडमध्ये अबुआ राज… अबुआ सरकार; सत्तेच्या चाव्या पुन्हा हेमंत सोरेन यांच्याकडे

झारखंड विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीने अभुतपूर्व असे यश मिळवले आहे. इंडिया आघाडीने 81 पैकी तब्बल 52 जागा जिंकून बहुमताचा 41 हा जादुई आकडाही पार केला. तर आणखी 4 जागांवर झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीचे उमेदवार आघाडीवर होते. भाजपप्रणीत एनडीएला केवळ 21 जागांवर मजल मारता आली. तर तीन जागांवर त्यांनी आघाडी घेतल्याचे चित्र होते. दरम्यान, विजयानंतर अबुआ राज, अबुआ सरकार… म्हणजेच आपले राज्य, आपले सरकारची स्क्रीप्ट झारखंडच्या जनतेने पुन्हा लिहिली, अशी भावना हेमंत सोरेन यांनी व्यक्त केली.

एनडीएने आक्रमक प्रचार करत विधानसभा निवडणुकीत 24 हून अधिक जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. परंतु, त्यांचा हा विश्वास पह्ल ठरला. झारखंडमधील जनतेने झारखंड मुक्ती मोर्चा आगाडीला भरघोस मतदान केले. या विजयाबद्दल मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जनतेचे आभार मानले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार झारखंड मुक्ती मोर्चाने 43 पैकी 34 जागा जिंकल्या. तर काँग्रेसने 30 पैकी 16 जागा जिंकल्या. राष्ट्रीय जनता दलने सहा जागा लढवल्या. त्यापैकी 4 जागा जिंकल्या. तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने चारपैकी 2 जागा जिंकल्या. तर भाजपाप्रणीत एनडीएने 68 पैकी 21 जागा जिंकल्या. यात राम विलास यांच्या लोक जनशक्ती पार्टीने एकच जागा लढवली आणि जिंकली. जनता दल युनायटेडने दोन पैकी एक जागा जिंकली. तर आजसू पार्टीने अत्यंत खराब कामगिरी केली. 10 पैकी केवळ एकच जागा जिंकली.

आम्ही लोकशाहीची परीक्षा जिंकली – हेमंत सोरेन

झारखंड मुक्ती मोर्चा आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतदान केल्याबद्दल झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी जनतेचे आभार मानले. तसेच इंडिया आघाडीने विधानसभा निवडणुकीत ताकद दाखवून दिली असून आम्ही लोकशाहीची परीक्षा पास झालो अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या. मला सर्व समाजातील लोक, शेतकरी, महिला आणि तरुणांचे आभार मानतो. इंडिया आघाडीची एकूण कामगिरी खूपच चांगली आहे, अशी भावना हेमंत सोरेन यांनी व्यक्त केली.