काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आपल्या पहिल्याच निवडणुकीत विक्रमी विजय मिळवला आहे. वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत त्यांनी तब्बल चार लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवत बंधू लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा मताधिक्याचा विक्रम मोडला आहे.
राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातील खासदारकीचा राजीनामा दिल्याने ही पोटनिवडणूक झाली. या निवडणुकीत प्रियांका गांधी यांनी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार सत्येन मोकेरी आणि भाजपच्या उमेदवार नव्या हरिदास यांचा दणदणीत पराभव केला. यंदा मतदानाची टक्केवारी कमी झाल्याने प्रियांका यांचे मताधिक्यही कमी असेल, अशी चर्चा होती. मात्र, मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीपासूनच प्रियांका यांनी प्रचंड मोठी आघाडी घेतली.
प्रियांका गांधी यांची आघाडी एकाही फेरीत घसरली नाही. त्यांनी 6 लाख 22 हजार 338 मते मिळवत तब्बल 4 लाख 10 हजार 931 मतांनी सहज विजय मिळवला. मोकेरी यांना 2 लाख 11 हजार आणि नव्या यांना 1 लाख 10 हजार मते मिळाली.
राहूल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वीच झालेल्या निवडणुकीत 3 लाख 65 हजारांच्या मताधिक्याने विजय मिळवला होता. परंतु, यावेळी मतदानाची टक्केवारी कमी असूनही प्रियंका गांधींनी मोठे मताधिक्य मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केल्याची चर्चा आहे.
संसदेत गांधी कुटुंबातील तीन सदस्य
आता संसदेत गांधी कुटुंबातील तीन सदस्य दिसणार आहेत. सोनिया गांधी या राज्यसभेच्या सदस्य असून राहुल गांधी रायबरेली मतदारसंघातून निवडून आले आहेत.