महायुतीला मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र महाराष्ट्रातील निकाल अनाकलनीय, अविश्वनीय आणि अनपेक्षित आहे. कोरोना काळात कुटुंबप्रमुख म्हणून माझं ऐकणारा महाराष्ट्र आमच्याशी असा वागेल यावर माझा विश्वास नाही. माझा महाराष्ट्र असा वागणार नाही. नक्कीच काहीतरी गडबड आहे.
प्रचंड वाढलेली महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचारामुळे मिंधे-भाजप सरकारविरोधात जनतेच्या मनात प्रचंड नाराजी असताना महायुतीला एकतर्फी यश मिळाले. शेतकऱयांच्या आत्महत्या होताहेत, महिला सुरक्षित नाहीत, ‘लाडक्या बहिणी’समोर घर कसे चालवायचे असा प्रश्न आहे, सोयाबीनला भाव नाही, कापूस पडून आहे म्हणून जनतेने यांना निवडून दिले का, असा प्रश्न पडत आहे. त्यामुळे हा निकाल अनाकलनीय, अविश्वनीय आणि अनपेक्षित आहे. नक्की कुठल्या रागापोटी ही लाट उसळली? जनतेला तरी हा निकाल पटलाय का? काहीतरी गडबड नक्कीच आहे. हे गुपित काही दिवसांत शोधावं लागेल, असे सांगतानाच निराश होऊ नका, खचून जाऊ नका, असे आवाहन आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि महाराष्ट्रातील तमाम जनतेला केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या एकतर्फी विजयानंतर उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकारांशी संवाद साधताना निकालावर आपली भूमिका मांडली. हा निकाल अनाकलनीय, अनपेक्षित असला तरी तो मान्य करावा लागेल असे ते म्हणाले. हा निकाल महाराष्ट्राच्या जनतेने दिला असेल यावर विश्वास बसत नसल्याचे स्पष्ट करताना आपण यापुढेही महाराष्ट्राच्या विकासासाठी लढत राहू असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेले यश पाहता चार महिन्यांत निकाल इतका बदलू कसा शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी व घटक पक्षांच्या सभांना प्रचंड गर्दी होत होती. त्याच वेळी मोदी शहांच्या सभांमध्ये मात्र खुर्च्या रिकाम्या दिसत होत्या. मिंध्यांचे भाषण सुरू असताना लोक सभा सोडून जात असल्याचे चित्र दिसत होते. मग या लोकांनी खुर्च्या रिकाम्या ठेवूनच आपलं मत भाजपलाच असा निश्चय सभेला न येताच आधीच केला होता का? असा टोलाही त्यांनी लगावला.
वन नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टी भीतीदायक
कोणताही विरोधक शिल्लक ठेवायचा नाही, अशीच भाजपची भूमिका असल्याचेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. म्हणूनच दीड वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी याबाबत वक्तव्य केले होते. ‘वन नेशन, वन इलेक्शन आणि वन पार्टी’ ही देशहितासाठी भीतीदायक गोष्ट असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आतातरी ‘अस्सल’ भाजपचा मुख्यमंत्री होईल
भाजपला मिळालेले यश म्हणजे लाट नसून त्सुनामी असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही फार प्रामाणिकपणे वागलो म्हणून जनतेने वाढती महागाई, बेरोजगारीला मतं दिली का, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आणि आतातरी ‘अस्सल’ भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी अपेक्षा आहे असे ते म्हणाले. एकनाथ शिंदेंना आता देवेंद्र फडणवीसांच्या हाताखाली काम करावे लागेल, असा टोलाही त्यांनी लगावला. महायुतीने आता जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता लवकरात लवकर करावी, निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण योजना पूर्ववत चालू करून लाडक्या बहिणीला दरमहा एकविसशे रुपये द्यावेत, शेतकऱयांना कर्जमुक्त करावे आणि सर्व आश्वासनांची पूर्तता लवकर करावी असे आव्हानच उद्धव ठाकरे यांनी महायुतीला दिले. नंतर असे म्हणू नका… असा जुमला निवडणुकीपूर्वी करावा लागतो, असा चिमटाही त्यांनी काढला.