Maharashtra Election Result 2024 – महविकास आघाडीच्या उमेदवारांची विजयी घोडदौड

नवखे रोहित पाटील विजयी

कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील यांनी पहिल्याच प्रयत्नात आपले पारंपरिक विरोधक माजी खासदार संजय पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. येथे अत्यंत काटय़ाची लढत झाली. रोहित पाटील यांच्या विरोधात भाजपचे माजी खासदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय पाटील यांच्यात लढत होती.

बार्शीत दिलीप सोपल विजयी

सोलापूर जिह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बार्शी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार माजी मंत्री दिलीप सोपल यांचा दणदणीत विजय झाला आहे. ‘मशाली’च्या विजयाने बार्शीत जल्लोष सुरू आहे. शिवसेनेचे दिलीप सोपल यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांचा धुव्वा उडवित सहा हजार मतांनी विजय मिळविला.

खेडमध्ये बाबाजी काळे यांचा विजय

खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे यांनी दणदणीत विजय मिळविला. काळे यांनी विद्यमान आमदार आणि अजित पवार गटाचे दिलीप मोहिते यांचा 51 हजार 743 मतांनी दारूण पराभव केला. काळे यांनी भंडारा उधळून खेड मतदारसंघावर भगवा फडकविला. त्यांच्या विजयाने तालुक्यात दिवाळी साजरी झाली.

कर्जतमधून रोहित पवार विजयी

शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत कर्जत-जामखेड मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भाजपचे आमदार राम शिंदे यांचा शेवटच्या 26व्या फेरीमध्ये पराभव केला. विजयानंतर रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

धारावीतून ज्योती गायकवाड विजयी

मुंबईतील लक्षवेधी लढत असलेल्या धारावीत महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. ज्योती गायकवाड यांनी बाजी मारली. पहिल्या फेरीपासून डॉ. ज्योती गायकवाड या आघाडीवर होत्या. धारावी बचावच्या महिला कार्यकर्त्या असलेल्या डॉ. ज्योती यांच्यावर धारावीकरांनी विश्वास दाखवला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीच्या जोरावर डॉ. ज्योती यांनी विजय खेचून आणला. डॉ. ज्योती गायकवाड या 23 हजार 459 मतांनी विजयी झाल्या. विजयाचे श्रेय महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचे आणि धारावीकरांचे असल्याचे डॉ. ज्योती यांनी सांगितले.

मानखुर्दशिवाजीनगरमध्ये अबू आझमी

महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे मानखुर्द-शिवाजीनगर मतदार संघाचे उमेदवार अबु असिम आझमी यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधली. 54 हजार 696 मतं घेत आझमींनी आपला गड कायम राखला. पहिल्या फेरीपासून घेतलेली आघाडी शेवटच्या फेरीपर्यंत कायम ठेवत अन्य उमेदवारांना त्यांनी पराभवाची धुळ चारली.

मालाडमधून अस्लम शेख यांचा चौकार

मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय मिळवत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अस्लम शेख यांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवला आहे. भाजपचे उमेदवार विनोद शेलार यांचा दणदणीत पराभव करत अस्लम शेख तब्बल 6227 मताधिक्याने विजयी झाले आहेत. मालाड पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अस्लम शेख विरुद्ध भाजपचे विनोद शेलार असा सामना रंगला.

मुंबादेवीतून अमीन पटेल

मुंबादेवी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांचा दणदणीत विजय झाला. अमीन पटेल यांनी  विजयाचा चौकार मारला. त्यांना 74990 मते मिळाली. तर शिंदे गटाच्या  शायना एन.सी. यांना 40146 मते मिळाली.

सोलापुरात महाविकास आघाडीचे वर्चस्व

सोलापूर जिह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघांत महाविकास आघाडीने तब्बल सहा जागा जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे. माढा, करमाळा, सांगोला, मोहोळ या विधानसभा मतदारसंघांत प्रस्थापितांना जोरदार दणका देत नवख्यांना संधी दिली आहे. जिह्यात महायुतीला पाच जागा मिळाल्या.

अविश्वसनीय ः चेन्नीथला

विधानसभा निवडणुकीचा निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्विकार्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली. टिळक भवन येथे पत्रकार परिषदेमध्ये चेन्नीथला यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचा निकाल हा जनतेच्या अपेक्षेविरुद्ध आहे. असा निकाल अपेक्षित नव्हताच असा सर्वत्र सूर आहे. आजचा निकाल अपेक्षेपेक्षा काहीतरी वेगळाच निघाला, असे चेन्नीथला म्हणाले.

विदर्भात तीन शिलेदारांनी गड राखला

विदर्भातील निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले असताना बाळापूरमधून शिवसेनेचे नितीन देशमुख यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी वंचित बहुजन आघाडीचे एस. एम. खातीत यांचा 11739 मतांनी पराभव केला, तर दर्यापूरमधून गजानन लवाटे यांनी राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टीचे रमेश गुंदिले यांचा पराभव केला. मेहकरमध्ये सिद्धार्थ खरात यांनी शिंदे गटाचे विद्यमान आमदार संजय रायमुलकर यांचा दणदणीत पराभव केला.