ईव्हीएमचा निकाल मान्य…मान्य…मान्य…

विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीनंतर जाहीर झालेल्या निकालांवर राज्यातील सर्वसामान्यांचा विश्वास नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यावर पत्रकारांनी खोदून खोदून प्रश्न केला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ईव्हीएमचा निकाल मान्य…मान्य…मान्य असे वक्तव्य करीत पत्रकार परिषदच आटोपती घेतली.

विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची आज संयुक्त पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना अजित पवार म्हणाले की, काल आणि आज सकाळी मतमोजणी सुरू होईपर्यंत प्रत्येक जण अंदाज व्यक्त करीत होते. निवडणुकीच्या अंदाजात आम्ही तिघे कुठेही नव्हतो. अंदाजानुसार आम्ही पावणे दोनशेच्या खाली जाऊ असे वाटत होते असे त्यांनी मान्य केले, पण निकाल जाहीर होण्यापूर्वी आम्ही पक्षाच्या बैठका घेतल्या नाही. कारण आम्हाला बहुमत मिळणार याची कल्पना होती, असे त्यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. या निकालावर लोकांचा विश्वास नाही, मतपत्रिकांवर निवडणुका घेण्याची मागणी महाविकास आघाडीने केली आहे.