साय-फाय – दिल्लीला विषारी विळखा

>> प्रसाद ताम्हनकर

थंडीची चाहूल लागलेली आहे आणि नेहमीप्रमाणे दिल्लीमध्ये विषारी हवेने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली. दर थंडीत हा घातक अनुभव दिल्लीकरांच्या नशिबी आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीची प्रदूषण पातळी ही ‘गंभीर’ या स्तरावर पोहोचली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार 14 नोव्हेंबर रोजी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक (Air Quality Index) 400 च्या पुढे गेला होता. 14 नोव्हेंबर रोजी देशातील सर्वात खराब हवा ही दिल्लीमध्ये पसरलेली होती. प्रदूषणाने 400 चा टप्पा गाठल्याने आता दिल्लीमध्ये प्रदूषण नियंत्रणासाठी ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन 3 लागू करण्यात आला आहे. तीन कोटी दिल्लीकर या विषारी हवेत श्वास घेत असताना सत्ताधारी आणि विरोधक मात्र त्याचे राजकारण करण्यात दंग आहेत.

‘एअर क्वालिटी लाईफ इंडेक्स’नुसार या गंभीर प्रदूषण पातळीमुळे दिल्लीकरांचे आयुर्मान 10 वर्षांनी कमी होत आहे. या घातक परिस्थितीला जबाबदार कोण आहे आणि त्यावर ठाम अशी उपाययोजना कोणती हे प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली आणि केंद्र सरकार हे फक्त एकमेकांवर आरोप करण्यात गुंतलेले आहेत. केंद्र सरकार आणि दिल्लीला लागून असलेल्या भाजपशासित राज्यांची सरकार या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी काहीही उपाययोजना करत नसल्याचा आरोप दिल्लीचे पर्यावरण मंत्री करत आहेत.

दिल्लीमध्ये सध्या पहिल्यांदा प्रदूषणाचे हॉट स्पॉट शोधण्यासाठी ड्रोन मॅपिंगचा पायलट प्रोजेक्ट राबवला जात आहे. 120 मीटर उंचीवरून उडणारे हे ड्रोन 200 मीटरच्या परिसरातील प्रदूषणाच्या प्रत्येक स्तराचा अभ्यास करतील आणि मिळालेली माहिती पर्यावरण विभागाकडे पाठवतील. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मिळालेल्या माहितीचा उपयोग करून संबंधित खात्याचे तंत्रज्ञ एक अहवाल बनवून दिल्ली सरकारला देतील. या अहवालाच्या मदतीने प्रदूषण लढय़ासाठी योग्य उपाय शोधण्यास महत्त्वाची मदत मिळणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या काही आठवडय़ात दिल्लीची प्रदूषण पातळी अचानक वाढू लागली आहे. पीक काढल्यानंतर उरणारे तण ज्याला या भागात पराली म्हटले जाते ते जाळण्यासाठी शेतकरी मोठय़ा प्रमाणावर आगी लावतात आणि हेच इथल्या प्रदूषणाचे मुख्य कारण आहे असे अनेकांचे ठाम मत आहे. हरियाणा आणि पंजाब भागातील शेतकरी भात पिकाच्या कापणीनंतर परालीला आग लावतात आणि हा कालावधी नेमका ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात असतो याकडे काही अभ्यासक लक्ष वेधत असतात.

या विषयातले काही तज्ञ आणि अभ्यासक मात्र फक्त शेतकऱयांना यासाठी जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे सांगतात. त्यांच्या मते दिल्लीच्या प्रदूषणात सर्वात मोठा वाटा हा थर्मल पॉवर प्लांटचा. बरेच अहवाल वाहनांपासून होणाऱया प्रदूषणाला दुसरा क्रमांक देतात. तसेच बांधकाम आणि इतर उद्योगांचाही यात समावेश असल्याचे दिसून येत आहे. वर्षातील 9 महिने 150 च्या आसपास असलेला दिल्लीचा एअर क्वालिटी इंडेक्स हा ऑक्टोबरपासून मात्र 200 चा टप्पा सहजपणे पार करायला सुरुवात करतो.

दिल्लीच्या प्रदूषणाविरुद्ध लढण्यासाठी सर्व स्तरातील लोकांनी एकमेकांना सहाय्य करण्याची गरज असल्याचे मत हवामान तज्ञ कायम व्यक्त करतात. सध्या प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने लोकांना खाजगी वाहनांचा वापर टाळून सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. मात्र 1998 सालात सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीला 10 हजार बसेसची गरज असल्याचे नमूद केले असताना, 2024 सालात देखील दिल्लीत फक्त 7600 बसेस असल्याकडे वाहतूक तज्ञ लक्ष वेधतात. सरकारने याची दखल घेत 106 शटल बसेस सुरू केल्या आहेत, ज्या दिवसाला 1844 फेऱ्या करतील. दिल्लीत गेल्या काही वर्षांत प्रचंड वेगाने बांधकामे झाली, मात्र त्या प्रमाणात पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे अनेक अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

[email protected]