>> मनीष वाघ
‘युगा मागुनी युगे लोटली, तप्त पृथ्वी ही शीतल झाली
अणुरेणूंच्या संरचनेतुनी, सजीव सृष्टी ही उदया आली’
ही सजीव सृष्टी पृथ्वीवर कधी अस्तित्वात आली, यावर बराच शास्त्राrय अभ्यास आजपर्यंत करण्यात आला, परंतु नक्की कोणीच काही सांगू शकलेले नाही. तरीही सखोल अभ्यासाअंती सुमारे 450 पन्नास कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा जन्म झाला असावा हा निष्कर्ष मानण्यात आला, पण या पृथ्वीवर सजीव सृष्टी केव्हा निर्माण झाली? हा प्रश्न मात्र अनेक अनुमाने, परिमाणे कोणत्याही ठोस उत्तराविना माणसाच्या मनात घट्ट रुतून आहे. या सजीव सृष्टीचा म्हणजेच जैवविविधतेचा प्रवास तिच्या जन्मापासून उलगडण्याचा प्रयत्न प्रा. संजय जोशी यांनी त्यांच्या ‘कथा जैवविविधतेची’ या पुस्तकातून करून दिला आहे. ठाण्यातील बांदोडकर आणि मुंबईतील के.जे. सोमय्या महाविद्यालयातून अनेक वर्षे जीवशास्त्र आणि पर्यावरणशास्त्राचे प्राध्यापक तसेच पर्यावरण दक्षता मंडळाच्या ‘आपलं पर्यावरण’ या मासिकाचे दोन दशके संपादक असलेले डॉ. संजय जोशी यांनी साकारलेला ‘कथा जैवविविधतेची’ हा प्रवास हा केवळ पर्यावरण अभ्यासकांसाठीच नव्हे, तर प्रत्येक मराठी वाचकाच्या संग्रही असावा असाच संदर्भ ग्रंथ झाला आहे.
सृष्टीची सुरुवात कशी झाली, याविषयी जागतिक एकमत झाले. मग या सृष्टीवर जीवसृष्टीची उत्पत्ती कशी झाली, यासाठी अभ्यास सुरू झाला. याबद्दल अनेक सिद्धांत आहेत. सर्वात लोकप्रिय सिद्धांतांपैकी एक डार्विनने स्वतः मांडला होता. त्याने असे सुचवले होते की, “छोटे उबदार तलाव हे जीवन सुरू होण्यासाठी सर्वात संभाव्य स्थान असू शकते.
फ्रँसेस्को रेडी, लझॅरो स्पलँझिनी, लुई पाश्चर, अलेक्झांडर ओपारिन, जॉन बर्डान, सँडरसन हाल्डेन, स्टॅनले मिलर, हॅरॉल्ड युरी यांसारखे अनेक शास्त्रज्ञ जीवसृष्टीवरील ‘पहिला जीव’ शोधण्यासाठी अनेक प्रयोग करत होते. अखेर युरी-मिलर यांनी केलेला प्रयोग, त्यांनी काढलेला निष्कर्ष ‘पहिल्या जीवा’बाबत ग्राह्य मानला गेला आणि पृथ्वीच्या म्हणजेच सृष्टीच्या जन्मापासूनच एक गुंतागुंतीचे कोडे सोडवण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले. हा सगळा गुंतागुंतीचा प्रवास डॉ. संजय जोशी यांनी अतिशय ओघवत्या शैलीत ‘कथा पृथ्वीची आणि जीवसृष्टीच्या जन्माची’ या प्रकरणातून वाचकांसमोर मांडला आहे.
‘जैवविविधतेचा विणकर’ या प्रकरणातून लेखकाने जीवसृष्टीत महत्त्वाचा ठरणारा ‘जीन्स‘ हा घटक शोधणाऱया अनेक ‘विणकरां‘चा म्हणजेच शास्त्रज्ञांचा परिचय त्यांच्या शोधासह लिहिला आहे. यात चार्ल्स डार्विनसह ग्रेगर जोआन मेंडेल यांचे नाव प्रामुख्याने येते. मेंडेल यांच्याबरोबरच रेजिनाल्ट प्युनेट,
वॉल्थर फ्लेमिंग, थॉमस मार्गन, विल्हेम जोहान्सन या विणकरांनी केलेले अथक परिश्रम, त्यांनी केलेले प्रयोग हे वाचायला मिळतात. जोहान्सन यांनी शोधलेला ‘जीन्स’चा अभ्यास म्हणजेच जेनेटिक्सचा अभ्यास हा आजचा प्रचलित शब्द झाला आहे.
‘जैवविविधतेचा जनक’ या प्रकरणातून डॉ. जोशी यांनी सजीवांमधील जीन्स किंवा जनुकांची रचना, क्रमवारी, संख्या यांचा आकृतिबद्ध अभ्यास उलगडवून दाखवला आहे. अतिसूक्ष्म ते महाकाय वनस्पती, प्राणी, पक्षी, कीटक या सजीवांचे बाह्यरंग जरी वेगवेगळे असले तरी यांच्या शरीरपेशी हा त्यांच्यातला समान धागा आहे. म्हणूनच त्यांच्या विविधता आहे. यासाठी लेखकाने ‘मोनेरा’ ‘प्रोटिस्ट’, ‘कवच’, ‘वनस्पती’, ‘पृष्ठीय-अपृष्ठवंशीय प्राणी’, ‘पक्षी’ अशा विविधतेचा सचित्र अभ्यास केला आहे.
‘जैवविविधतेचा अफाट पसारा’, ‘जैवविविधतेचा एक जागतिक सहकारी बँक’ या प्रकरणांमधून लेखकाने संपूर्ण सजीव सृष्टीच आपल्यापुढे उभी केली आहे. परंतु मानवी हस्तक्षेपामुळे ती सजीव सृष्टी म्हणजेच जैवविविधता धोक्यात आली आहे. आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण ही जीवसृष्टी आपल्या फायद्यासाठी कशीही वापरू शकतो, असा एक भ्रम त्याच्या मनात निर्माण झाला आणि या भ्रमाची फळे आज आपण म्हणजेच मानव अनुभवतो आहे. जैवविविधता हे हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाविरूद्ध सर्वात मजबूत नैसर्गिक संरक्षण आहे.
जैवविविधतेच्या संवर्धनाचा वसा घेतलेले अनेक जण आज वैयक्तिक आणि संस्था पातळीवर कार्यरत आहेत. आपणही त्यांच्या कार्यात सहभागी झालो तर सजीव सृष्टी नक्कीच अबाधित राहील. ‘कथा जैवविविधतेची – प्रवास जीवसृष्टीचा’ हा ग्रंथ आपल्याला हाच संदेश देतो.
कथा जैवविविधतेची – प्रवास जीवसृष्टीचा
लेखक ः डॉ. संजय जोशी
प्रकाशक ः सृजनसंवाद प्रकाशन
पृष्ठे ः 248
किंमत ः रु. 500/-