>> धीरज कुलकर्णी
मराठी साहित्याला लाभलेले ‘नक्षत्रांचे देणे’ म्हणजे चिं. त्र्यं. खानोलकर ऊर्फ आरतीप्रभू.
खानोलकर या नावाने गद्य, तर आरती प्रभू या नावाने कविता लेखन त्यांनी केले. आपल्या अल्पायुष्यातही मोठे काम खानोलकरांनी करून ठेवले.
आयुष्याचा सुरुवातीचा बराच काळ तळकोकणात रम्य प्रदेशात गेल्यामुळे तिथली सृष्टी ही खानोलकरांच्या लेखनाचे अविभाज्य अंग बनली. खानोलकरांची शब्दकळा, प्रतिमासृष्टी ही अनोखी ठरते. वाचकाच्या मनाचा ठाव घेते. या ठाव घेणाऱया मानवी संज्ञा प्रवाहाचे मनोवेधक चित्रण करावे ते खानोलकरांनीच. आपल्या कथांमधून कोकणातील फक्त सृष्टिसौंदर्यच नव्हे, तर तिथले समाज जीवन, दारिद्रय़, अंधश्रद्धा आणि एकूणच अभाव यांचे विषण्ण करणारे चित्र त्यातून ते उभे करतात.
‘सनई’ या त्यांच्या कथासंग्रहात एकूण बारा कथा समाविष्ट केल्या आहेत. या सर्व कथा खानोलकरांच्या ताकदवान लेखणीची साक्ष देतात. यातील सर्व कथा या लघुकथा आहेत. लघुकथा साहित्य प्रकारात मध्यवर्ती मुख्य एक घटना, तिच्याशी संबंधित मोजके प्रसंग, कमी पात्रे या सामग्रीनिशी लेखकाला एक सखोल जीवनानुभव मांडायचा असतो.
खानोलकर या ठिकाणी भरीस म्हणून अस्सल कोकणी संवाद आणि प्रतीकांचा वापर करतात. बारकाईने केलेला प्रतीकांचा कथेतील वापरामुळे या कथा वेगळ्या उंचीवर पोहोचतात. ‘सनई’ या शीर्षक कथेत एका लहान मुलाच्या नजरेतून जुन्या कोकणातील खेडय़ाचे एक विश्व रेखाटले आहे. अबोध वयात मुले जो भवताल पाहतात, त्याबाबत प्रश्न विचारतात. सगळ्याच प्रश्नांची उत्तरे मोठय़ांकडे नसतात. मंदिरात सनई वाजवणारा म्हातारा, त्याची वेडसर मुलगी, मंदिरात आलेला गूढ साधू हे मुलांना चकित करत राहतात. आसपास घडलेले मृत्यू हे त्यांच्या मनात प्रश्न निर्माण करतात. साधूपासून वेडय़ा मुलीला दिवस जाणे आणि नंतर बापानेच तिची हत्या करणे वाचकाला सुन्न करते.
‘जनार्दन गुंडोबा’ कथेतील नायक हा मध्यमवयीन, कोकणातील खेडय़ात पत्रे लिहून देणारा, निरोप देणारा, पण मुलखाचा प्रामाणिक. एक दुःखद निरोप पोचवण्यासाठी तो कुडाळला जातो आणि खिशातील पैशांचा मोह पडून करतो काय, तर पोटभर जेवून घेतो. त्या काळी दोनवेळा पोटभर अन्न मिळणे हीसुद्धा चैन होती. मात्र त्याची सदसद्विवेकबुद्धी त्याला खात राहते. झोप लागत नाही. ज्याला निरोप सांगायचा त्याच्यासोबत तो सिनेमा पाहतो. हीसुद्धा चैनच. आजच्या नेटफ्लिक्सच्या काळात वाचकाला हे अशक्य वाटेल खरे, पण आपल्या या घोर पापाची कबुली दिल्यावर मात्र त्याला गाढ झोप लागते.
‘वेडा राघू’ ही कथा आदिबंधात्मक दृष्टीने वाचल्यास अधिक आनंद देते. खेडय़ातील हिरवागार परिसर, एका छोटय़ा घरात पोपटाचे आगमन होते आणि त्याच्या ओरडण्याने घरातील लोक त्रस्त होतात. अखेर कथानायकाने त्यावर केलेला उपाय अघोरी वाटला तरी प्रतीकात्मकदृष्टय़ा ही कथा बरेच वेगळे काही सांगते.
समाजात एकटी राहणारी बाई हा आजही लोकांच्या औत्सुक्याचा विषय. त्यातच ती गरोदर असेल तर पाहायलाच नको. शेजारच्या बिऱहाडात आलेली बाई, घरातील सगळ्यांशी चांगले संबंध जोडते आणि मग एक दिवस अचानक नाहीशीही होते. ही कथा सांगत असताना खानोलकरांनी वापरलेले जास्वंदीच्या फुलाचे रूपक अप्रतिम. ‘हडकुळा आणि गलेलठ्ठ’, ‘एक फाटका माणूस’ कथांमधून अगदी तळागाळातील तत्कालीन सामान्य माणसाचे जीवन, त्याची दुःखे याचे दर्शन घडते.
‘रेघा’ या कथेतील लहानगा आजारी वडिलांच्या मृत्यूनंतर आणि आई शेजाऱयाबरोबर गेल्यानंतर स्वतला सावरतो ते वाचताना मनात कालवाकालव होते. खरे तर खानोलकरांच्या या कथासंग्रहातील प्रत्येक कथेवर दीर्घ लिहिता येईल. या कथांचा अवाकाच तसा आहे. वाचक या कथांमध्ये गुंग होतो तो त्यांच्या पकड घेण्याच्या शैलीमुळे.
खानोलकरी कथांचे महत्त्वाचे अंग म्हणजे मानवी भावबंध व त्यातील दुःखांची सोलीव ठेवण. ती प्रत्येकाला आपलीशी वाटते आणि हे वाटणं त्या कथेत तादात्म्य पावतं. वाचकाला स्वतचा भवताल जोखायला लावतं. सार्वकालिकतेचा अंश प्रत्येक वाचकाला गवसतो तो यामुळेच. खानोलकरांना कथात्म साहित्याचे सूक्ष्म व सखोल ज्ञान होते. त्यांच्या सर्वच कथांमध्ये एक रूपके व प्रतिमा यांचा खुबीने वापर केलेला दिसतो. घटनांचा वेगवान क्रम हे त्या कथांमध्ये नाहीच. घटना साधीशीच, पण त्याभोवतीचे पात्रांचे मनोविश्लेषण अतिशय सुंदर.
या सर्वच कथा आजच्या काळानुसार पाहिल्या गेल्या तर कदाचित जुनाट वाटतीलही, परंतु कथेच्या अभ्यासकांना ‘सनई’सारखी पुस्तके यापुढेही खुणावत राहतील.