छत्तीसगडमध्ये दहा नक्षलवाद्यांचा खात्मा

छत्तीसगडच्या सुकमा जिह्यात पोलीस आणि नक्षलांत चकमक सुरू असून जवानांनी तब्बल दहा नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून तीन अद्ययावत स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली. तसेच नक्षलवाद्यांचे सर्व मृतदेहही हाती लागले आहेत. चकमक अजूनही सुरूच असून अधूनमधून गोळीबारही सुरू आहे. मेज्जी पोलीस ठाण्याच्या हद्दीत नक्षलवादी आणि पोलीस जवानांमध्ये चकमक उडाली. दरम्यान 1 जानेवारी ते 22 नोव्हेंबरपर्यंत 207 नक्षलवादी मारले गेले आहेत.

आज उडालेल्या चकमकीत आतापर्यंत दहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळवरून एके 47, इन्सास आणि एसएलआरसह इतर शस्त्रsही जप्त करण्यात आली आहेत. हे मोठे यश असल्याचे सुकमाचे पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी म्हटले आहे. दरम्यान जवानांनी यशस्वी मोहिमेनंतर नाचून आनंद व्यक्त केला.

आदमच्या जंगलात नक्षलवाद्यांनी पोलीस जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. जवानांनीही त्याला चोख प्रत्युत्तर दिले. त्यामुळे नक्षलवाद्यांनी पळ काढला. नक्षलवाद्यांच्या ठिकाणाहून पोलिसांनी रायफल, जिवंत काडतुसे, नक्षलवाद्यांचे साहित्य आणि मोठय़ा प्रमाणावर कपडे, दैनंदिन वापराच्या वस्तू हस्तगत केल्या.

नक्षलवाद्यांची ओडिशातून घुसखोरी

मेज्जीच्या जंगलात नक्षलवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. एक दिवस आधी ओडिशातून मोठय़ा संख्येने नक्षलवादी छत्तीसगड सीमेत घुसले होते. या काळात ओडिशा पोलिसांसोबत चकमकही झाली. यात एक नक्षलवादी ठार झाला असून एक जवान जखमी झाला आहे. यानंतर छत्तीसगड फोर्स अलर्टवर गेली. दरम्यान ओडिशा आणि गरिआबंदला लागून असलेल्या उदांती अभयारण्याच्या जंगलात गुरुवारीही पोलीस-नक्षलवादी चकमक झाली. नक्षलवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळताच गरिआबंद पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली.