दुपारी किंवा रात्री उशिरा एकटय़ाने प्रवास करणाऱ्या महिलांना टार्गेट करून चोऱ्या करणाऱ्याला बोरिवली रेल्वे पोलिसांनी अटक केली. विशाल कौर असे त्याचे नाव आहे. तो चोऱ्या करण्यासाठी मास्कचा वापर करतो. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
तक्रारदार महिलेने बुधवारी ग्रॅण्ट रोड येथून विरारला जाणारी लोकल पकडली. दादर स्थानक आल्यावर विशाल त्या डब्यात शिरला. लोकल अंधेरी स्थानकानंतर स्लो होते. त्याचा फायदा विशालने घेतला. लोकल गोरेगाव स्थानकात आली. तेव्हा डब्यात फारसे कोणी नव्हते. लोकल सुरू होताच त्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र घेऊन पळ काढला. घडल्या प्रकरणी महिलेने बोरिवली पोलीस ठाण्यात धाव घेतली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला.
उपायुक्त मनोज पाटील यांनी तपासाच्या सूचना दिल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता खुपेकर यांच्या पथकातील निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक निरीक्षक के.बी. कांबळे, उपनिरीक्षक जे.व्ही. मुलगीर आदी पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. एका फुटेजमध्ये विशाल दिसला.
पोलिसांनी मालवणी परिसरात सापळा रचून विशालला ताब्यात घेतले. त्याने ते चोरीचे मंगळसूत्र हे घरात लपवून ठेवले होते. पोलिसांनी ते मंगळसूत्र जप्त केले आहे. विशाल हा चोऱ्या करण्यासाठी मास्कचा वापर करतो. तो दुपारी किंवा रात्री उशिरा चोऱ्या करण्यासाठी रेल्वेत येतो. एकटय़ाने प्रवास करत असलेल्या महिलांची रेकी करतो. रेकी केल्यानंतर संधी मिळताच तो धावत्या लोकलमधून उडी मारत ट्रकमधून पळून जातो, अशी त्याची गुह्याची पद्धत आहे.