अवजड वाहनांना प्रवेशबंदीसाठी सरकारने काहीच केले नाही, प्रदूषणावरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीत वाढत चाललेल्या प्रदूषणावरून दिल्ली सरकारला फटकारले. दिल्ली सरकारने जे प्रयत्न केले आहेत त्याबद्दल आम्ही समाधानी नाही. सरकारने ट्रक म्हणजेच अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदीसाठी काहीच केले नाही, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला फैलावर घेतले. शहरात 113 एंट्री पॉइंटवर केवळ 13 सीसीटीव्ही का आहेत? असा सवाल करत सर्व एंट्री पॉइंट्सवर पोलीस तैनात करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले.

प्रदूषण रोखण्याबाबत समिती तयार करावी असे आम्ही म्हणणार नाही, परंतु अवजड वाहनांबद्दलच बघा. दिल्ली सरकारने आतापर्यंत काहीच केले नाही. अवजड वाहनांवर बंदी घालण्यासाठी ठोस पाऊल का उचलले नाही, याचे उत्तर दिल्ली सरकारला द्यावे लागेल – सर्वोच्च न्यायालय

शहरात येणाऱया अवजड वाहनांवर बंदी घातली जात आहे की नाही, याची पडताळणी करण्यासाठी एक न्यायालयीन पथक तयार करावे. या न्यायालयीन पथकात आम्ही बार असोसिएशनच्या तरुण वकिलांचा समावेश करू असे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. न्यायमूर्ती अभय ओका आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसील यांच्या खंडपीठाने प्रदूषण नियंत्रण करण्याप्रकरणी दिल्ली सरकारने उचललेल्या पावलांबद्दल असमाधान व्यक्त केले. आदेश देऊनही दिल्ली पोलीस स्टेज 4 चे निर्बंध वेळेवर लागू करण्यास अपयशी ठरल्याचे सर्वोच्च न्यायालय म्हणाले. जीआरएपी-4 चे निर्बंध आणखी कमीत कमी तीन दिवस लागू करायला हवेत, असे सांगतानाच पुढील सुनावणी 25 नोव्हेंबरला होईल, असेही न्यायालयाने नमूद केले.

न्यायालयात नेमके काय घडले?

यावर आमच्याकडे अशी यादी नाही असे सरकार म्हणाले. या उत्तरावर तुमच्याकडे यादी नाही म्हणजेच कुठल्याही प्रकारची तपासणी होत नाही. तुमच्या प्रतिज्ञापत्रातही याबाबत माहिती नाही. मग तुम्ही अवजड वाहने कुठल्या पद्धतीने थांबवत आहात? असा सवाल न्यायालयाने केला.

वैद्यकीय साहित्य, औषधे, तेल आणि इंधन इत्यादी आवश्यक साहित्यांमध्ये येतात, असे सरकारने सांगितले. या उत्तरावर या सर्वांची तपासणी कोण करत आहे? असा सवाल न्यायालयाने केला असता वाहतूक पोलीस अधिकारी असे उत्तर सरकारने दिले. नियमांची अंमलबजावणी होतेय की नाही ते तपासा, अशी आमची सूचना असल्याचे न्यायालयाने सांगितले.

ही राष्ट्रीय आणीबाणी; मुलांचे भविष्य हिरावून घेत आहे

उत्तर हिंदुस्थानातील वायू प्रदूषण ही राष्ट्रीय आणीबाणी असून हे सार्वजनिक आरोग्य संकट आहे जे आपल्या मुलांचे भविष्य हिरावून घेत आहे. वृद्धांचा श्वास कोंडत असून हे संकट असंख्य जिवांचा नाश करत असल्याचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. त्यांनी वाढत्या वायू प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त केली असून एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या ‘एक्स’ अकाऊंटवर शेअर केला आहे. वायू प्रदूषणाचा सर्वाधिक त्रास गरीब लोकांना होत असून स्वच्छ हवेसाठी ही कुटुंब अक्षरशः तळमळत आहेत. मुले आजारी पडत असून लाखो जीव गमावले जात आहेत. पर्यटन कमी होत असून देशाची जागतिक प्रतिष्ठा घसरत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. काही दिवसांत संसदेचे अधिवेशन होणार असून तिथे खासदारांना जळजळणाऱया डोळय़ांच्या आणि घशाच्या समस्यांमुळे प्रदूषणाची समस्या आठवेल, असा टोलाही राहुल गांधी यांनी लगावला आहे.