‘नाशिक पश्चिम’ येथे ईव्हीएममध्ये परस्पर बदल आणि बोगस मतदान

नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील सात मतदान केंद्रांवर उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना अंधारात ठेवून मतदान यंत्र बदलण्यात आले, अशी धक्कादायक माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार, जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. यंत्र बदलाचा हा प्रकार संशयास्पद असून, ते स्कॅनिंग केलेले असू शकतात. मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱयांची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मतदारसंघात बोगस मतदान झाल्याचेही बडगुजर यांनी यावेळी सांगितले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शुक्रवारी पत्रकार परिषदेत बडगुजर यांनी ईव्हीएम बदलाची माहिती दिली. मतदानाच्या तीन दिवस आधी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईव्हीएमची छाननी होते, प्रतिनिधींना ते दाखवले जातात. मात्र, बुधवारी मतदान झाल्यानंतर दिलेले 17सी बघितले असता पश्चिमच्या सात केंद्रांवरील यंत्रांच्या क्रमांकात तफावत दिसून आली. केंद्र क्रमांक 221 येथे बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट तिघेही बदलले आहेत. केंद्र क्रमांक 6, 306, 329 या ठिकाणी व्हीव्हीपॅट; केंद्र क्रमांक 174, 191 आणि 269 येथे बॅलेट युनिट परस्पर बदलण्यात आले आहे. हे उमेदवारांच्या प्रतिनिधींपासून लपवण्यात आले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. याविषयी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जलज शर्मा यांच्याकडे प्राथमिक स्वरुपात तक्रार केलेली आहे. त्यांनी 17 सी मधील बदलांविषयी स्पष्टीकरण देवून न्याय दिला पाहिजे.

छाननीवेळी वेगळे आणि प्रत्यक्ष दुसरेच यंत्र वापरले गेले, रिमोट कंट्रोलने किंवा बाहेरून स्कॅनिंग करून हॅकरमार्फत युनिट जोडल्यास हे मतदान विशिष्ट उमेदवाराला जावू शकते, हे सुमारे दहा हजार मतदान असावे, असेही ते म्हणाले. याचे स्पष्टीकरण मिळाल्याशिवाय मतमोजणी कशी होवू शकते, असा सवालही त्यांनी केला.