रंगभूमी – सुधीर भट… एक सुयोग!

>> अभिराम भडकमकर

सुधीर भट नाटय़निर्माता म्हणून जितके प्रसिद्ध होते तितकेच माणूस म्हणूनही ग्रेट होते. ते रागावत त्यातही एक छानसा मोकळेपणा आणि आपलेपणा असायचा. कल्पनेतले सुधीर भट आणि समोर आलेले हे सुधीर भट यात प्रचंड अंतर होतं. अत्यंत मोकळाळा असा माणूस. त्यांच्यासोबतची प्रथम भेट हा आयुष्यातला एक ‘सुयोग’ योगच ठरला.

एके दिवशी अरुण नलावडे आणि मी शिवाजी मंदिरवरती गप्पा मारत उभे होतो आणि अचानक सुधीर भट आले. माझा परिचय नव्हता. मी नुकताच नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून आपला कोर्स पूर्ण करून आलो होतो. भट आल्यावर त्यांची ओळख अरुण नलावडे यांनी करून दिली. भट वैतागले होते. अरुणला म्हणाले, अरे कधी देतोयस नाटक? तू दिलेली भल्या भल्या लेखकांची नाटकं अशोक सराफांनी नाकारलीत. बघ, आठ दिवसांत मला काहीतरी दे, नाहीतर तो जाईल अमेरिकेला निघून सुट्टीसाठी.

हा कोण? माझ्याकडे बघत भटांनी विचारले. नलावडे यांनी माझी ओळख करून दिली. त्यात हा एकांकिकासुद्धा लिहितो, एक हिंदी दोन अंकी नाटक लिहिलंय जे नॅशनल स्कूल ड्रामाचे विद्यार्थी करणार आहेत, असं सांगितलं. भट मला म्हणाले, एखादं विनोदी नाटक लिहून देशील का? मी म्हटलं, अहो मी दोन अंकी नाटक आतापर्यंत लिहिलेलं नाही. एक दीर्घांक लिहिला आहे इतकंच.

मग काय झालं? काहीतरी बघ विनोदी असेल तर. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जॉर्ज फेदोचं एक नाटक मी वाचलं होतं. ती फ्रेंच सेक्स कॉमेडी होती. पण मला कायमच वाटत राहिलं की त्यावर एखादं छान कौटुंबिक नाटक होऊ शकेल. मी त्यांना तसं म्हटलं. तर लगेच म्हणाले, आठ दिवसांत लिहून दे. मी दचकलोच. बापरे! आठ दिवसात? मूळ क्रिप्टही माझ्याकडे नाही. ते भडकलेच. म्हणाले, ते मला काय सांगू नको. आठ दिवसांनी मला नाटक दे आणि ते निघूनही गेले. ना ओळख ना पाळख. म्हणजे निर्माता म्हणून मी त्यांना ओळखत होतो, पण ते मला ओळखत नव्हते. तरीसुद्धा त्यांचं हे रागावणं मला कुठेतरी गमतीदार वाटून गेलं. बरं त्या रागावण्यामध्येसुद्धा एक छानसा मोकळेपणा आणि आपलेपणा होता. त्यांनी निर्मित केलेली नाटकंही पाहिली होती, परंतु कल्पनेतले सुधीर भट आणि समोर आलेले हे सुधीर भट यात प्रचंड अंतर होतं. मला कल्पनाही नव्हती की हा माझ्या आयुष्यातला एक सुयोग ठरणार आहे. आता काय करायचं? नलावडे म्हणाले, बघ, कर प्रयत्न!

…आणि खरोखरच मी ते मनावर घेतलं. फेदोच्या नाटकाची एक तीन अंकी कौटुंबिक कॉमेडी आणि सुखांतिका केली. अरुण नलावडेंना वाचून दाखवली. दहाव्या दिवशी अरुण नलावडे यांनी सुधीर भटांसोबत अशोक सराफ यांना वाचून दाखवली. पहिला सीन संपताच अशोक सराफ यांनी माझ्याकडे बघून आवडत असल्याची खूण केली. याचं अर्थात श्रेय अरुण नलावडे यांच्या वाचनाचंसुद्धा होतं. तो पहिलाच खर्डा अशोक सराफ यांना आवडला आणि पुते नाटक माझ्याही नकळत रंगमंचावर ‘हसत खेळत’ या नावाने आलं. ठरवलेलं नसताना, डोक्यात काहीही नसताना अचानक भट भेटले आणि त्यांनी माझ्याकडून नाटक लिहून घेतलं.

एखाद्या माणसाच्या चेहऱयावर आपल्यामुळे हसू फुललं तर खूप आनंद होतो. हा आनंद पु. ल. देशपांडे आणि आचार्य अत्रे यांनी मराठी जनमानसाला पोट भरून दिला. अशा अत्र्यांचं नाटक घेऊनच सुधीर भटांनी रंगभूमीवर पाऊल ठेवलं होतं. मोरूची मावशी! अत्र्यांचा विनोद हा अजूनही आऊटडेटेड नाही याचं ते द्योतक होतं. असेच एक नाटक तरुण तुर्क. मराठी रंगभूमीवर फार्सिकल नाटकांची मोठी परंपरा आहे. त्यातच मला ‘हसत खेळत’सारखं नाटक लिहायला मिळालं याचा मला खूप आनंद आहे. सुधीर भटांसाठी केलेल्या या नाटकांनी माझ्यातला लेखक लोकांसमोर आला.

त्यानंतर भटांनी माझ्याकडे अरे यावर करून दे, अरे त्यावर करून दे म्हणत इंग्रजी नाटकांची चळतच पाठवायला सुरुवात केली. आणि मी नाकारायचो. ते म्हणायचे, अरे तू मुंबईत आला आहेस. नोकरी नाही, फक्त नाटक करतोयस. कशाला या संधी नाकारतोस? मग मी त्यांना एक मेलोड्रमॅटिक वाक्य ऐकवायचो. ‘भट, माझं नाटकावर पोट आहे. पण मी पोटासाठी नाटक लिहीत नाही’ त्यावर ते ‘त्यांच्या भाषेत’ चिडायचे. अर्थात त्यांची भाषा म्हणजे कशी तर पु. ल. देशपांडे यांची रावसाहेबांची भाषा. अगदी तशी. म्हणजे एका वाक्यात तीन भच्या शिव्या.

माझा एक दिग्दर्शक मित्र अनिरुद्ध खुटवड पहिल्यांदा माझ्यासोबत त्यांना भेटला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर भट म्हणजे अत्रेंची, पुलंची नाटके रंगभूमीवरती आणणारे. त्यामुळे त्यांचा साहित्याचा किती व्यासंग असेल वगैरे वगैरे अशी प्रतिमा मनात घेऊन होता. पण त्यांच्या भाषेचं रावसाहेबांशी असलेले साम्य पाहून तो चक्रावलाच.

पण भटांच्या या भाषेच्या पलीकडे प्रचंड जिव्हाळा आणि आपुलकी होती. ते कलावंतांवर प्रेम करायचे. कलावंतांसाठी भरभरून खर्च करायचे. दौऱयामध्ये कलावंतांना जपायचे. कलावंतांच्या घरगुती आणि आर्थिक अडचणीच्या वेळी पाठीशी उभे राहायचे. स्वतच्या पदराला खार लावून. कारण नाटक हेच त्यांचं आयुष्य होतं. जरी एक दुसरा व्यवसाय हाताशी असला तरी. ते कायम म्हणायचे, आम्ही नाटक घेऊन झोपतो. आम्ही नाटक घेऊन जागे होतो आणि दिवसभर आम्ही नाटक घेऊन जगतो. हे खरंच होतं. हे त्यांचं नाटकांवरचं प्रेम सतत दिसत असे आणि म्हणून समग्र मराठी कलावंत त्यांच्यावर खूप प्रेम करत. ते निर्माता म्हणून कधी इतरांपेक्षा वेगळे अथवा बाजूला राहिले नाहीत. त्यांच्यातलेच एक होऊन राहिले.

त्यांना तारखा तोंडपाठ असायच्या. आपल्याच नाही, तर दुसऱयांच्यासुद्धा. चुकून जरी कुणी, अहो माझा गुरुवार रात्री, पनवेलला प्रयोग आहे म्हटलं तर अरे नाही नाही तो तुझा नाही. तो त्यांचा प्रयोग, असं तातडीने ते म्हणत. कारण सगळय़ांच्या तारखा तोंडपाठ. माझ्याविषयी त्यांना खूप काळजी असायची. मी मोजकीच नाटक लिहितो म्हणून ते रागवायचेसुद्धा. अरे, अर्थकारणाकडे पण बघ ना जरा. मग मी हिंदी मालिका लिहायला लागलो तेव्हासुद्धा भरमसाट मालिका लिहिण्यापेक्षा एका वेळेला एकच मालिका लिहायचो. म्हणजे बाकी वेळ आपल्याला लेखन-वाचन यासाठी मिळतो असं माझं गणित. याचीही त्यांना काळजी वाटायची. अरे, हा चलती असूनसुद्धा फार कमी लिहितो रे असं ते म्हणायचे. कधीही भेटले की खांद्यावरती हात टाकून, तुझं बरं चाललंय ना? असा प्रश्न विचारायचे. कधीतरी त्यांचा फोन यायचा तो पहाटे पावणे सहा ते सहाच्या दरम्यान. नवीन काही कॉमेडी आहे का, असा प्रश्न ते विचारायचे.

मात्र त्यानंतर मी खूप वेगवेगळ्या पद्धतीची नाटकं केली आणि नवीन कॉमेडी देणं मला काही जमलं नाही. देऊ, करू असं म्हणत असतानाच एक दिवस भट अचानक निघूनच गेले. जसं एखादं वादळ यावं तसे आयुष्यात आले आणि वादळ विरून जावं तसे निघूनही गेले. काळ आणि रंगभूमी कोणासाठी थांबत नाही. परंतु काही माणसं तुमच्या आयुष्यात एखादी मोलाची भूमिका बजावतात. त्यांचे ठसे मात्र तुमच्या काळजावर कायम उमटलेले असतात. माझ्या आयुष्याला एक अकस्मात वळण देऊन भट 14 नोव्हेंबर 2013 ला निघून गेले. आजही कधीतरी पहाटे अचानक जाग येते, वाटतं… आता फोन वाजेल आणि भट काळजीयुक्त स्वरात विचारतील, ‘तुझं बरं चाललंय ना रे?’

लोकांना आपल्या नाटकातून मनमुराद हसवणारा हा माणूस… त्याच्या आठवणीने डोळे ओले होतात…

[email protected]
(लेखक नाटय़कर्मी असून नाटय़क्षेत्राचे अभ्यासक आहेत)