बहुप्रतीक्षित बॉर्डर-गावसकर करंडकाचा पहिला कसोटी सामना पर्थमध्ये सुरू झाला असून गोलंदाजांनी पहिला दिवस गाजवला. प्रथम ऑस्ट्रेलियाच्या आणि नंतर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाची 67 धावांवर 7 गडीबाद अशी दयनीय अवस्था झाली आहे. पहिल्या डावात टीम इंडियाचे फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात सपशेल अपयशी ठरले, मात्र फलंदाजांच्या चुकांवर पांघरून फिरवून गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले.
प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाचा संपूर्ण संघ अवघ्या 150 या धावसंख्येवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांपुढे टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. के एल राहुल (74 चेंडू 26 धावा), ऋषभ पंत (78 चेंडू 37 धावा) आणि नितीश रेड्डी (59 चेंडू 41 धावा) यांच्या व्यतिरिक्त इतर फंलदांज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. विराट कोहलीकडून संघाला जास्त अपेक्षा होत्या. मात्र, विराट कोहली अवघ्या 5 या धावसंख्येवर झेलबाद झाला. टीम इंडियाला फक्त 150 या धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाकडून हेझलवूडने सर्वाधिक चार विकेट घेतल्या तर मिचेल स्टार्क, कर्णधार कमिंन्स आणि मिचेल मार्श यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
प्रत्युत्तरात उतरलेला ऑस्ट्रेलियाचा संघ मोठी धावसंख्या उभारणार असे सर्वांना वाटले होते. मात्र, टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराहने संघाची सुत्र आपल्या हाती घेत ऑस्ट्रेलियाचे मनसुबे उधळून लावले. जसप्रीत बुमराहला वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि हर्षित राणा यांची मोलाची साथ लाभली. तिघांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अक्षरश: आपल्या तालावर नाचवले. जसप्रीत बुमराहने 17 धावा देत चार विकेट घेतल्या. तसेच मोहम्मद सिराजने 2 आणि हर्षित राणा याने 1 विकेट घेतली. त्यामुळे पहिल्या दिवसा अखेर ऑस्ट्रेलियाची 7 गडीबाद 67 धावा अशी दयनीय अवस्था झाली आहे.