रत्नागिरी – मतमोजणीसाठी 546 कर्मचारी व 700 पोलीस तैनात

विधानसभा निवडणूकीसाठी उद्या 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे.मतमोजणीच्या कामात 546 कर्मचारी व्यस्त रहाणार आहेत तर 700 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात रहाणार आहेत.पाच विधानसभा मतदारसंघात 38 उमेदवार रिंगणात आहेत.

विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान झाले.त्यानंतर इव्हीएम मशीन स्ट्रॉंग रूम मध्ये ठेवण्यात आल्या.जिल्ह्यात दापोली,गुहागर,चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर मतदारसंघात शांततेत मतदान झाले.जिल्ह्यात 65.23 टक्के मतदान झाले.13 लाख 39 हजार 697 मतदारांपैकी 8 लाख 76 हजार 737 मतदारांनी आपला हक्क बजावला.त्यामध्ये 4 लाख 27 हजार 363 पुरूष 4 लाख 46 हजार 670 महिला मतदार आणि इतर 4 मतदारांचा समावेश आहे.

पाचही विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी होणार आहे.पाचही विधानसभा मतदारसंघात 70 टेबल वर इव्हीएम मशीन ची मतमोजणी होणार असून 26 टेबलवर पोस्टल मतदानाची मोजणी होणार आहे.इव्हीएम मतमोजणीसाठी 345 कर्मचारी आणि पोस्टल मतदानासाठी 201 कर्मचारी व्यस्त रहाणार आहेत.

सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहेत. मतमोजणी केंद्राबाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.पाचही विधानसभा मतमोजणी केंद्रात 700 पोलीस बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 110 पोलीस अधिकारी,केंद्रीय राखीव दलाची चार पथके आणि राज्य राखीव दलाची दोन पथके तैनात रहाणार आहेत.सीसीटिव्ही व्हॅन आणि द्रोण संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहे.त्याशिवाय संवेदनशील परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले.

मतमोजणी ठिकाणे पुढील प्रमाणे

दापोली – विश्वेश्वरय्या सभागृह,कोकण कृषी विद्यापीठ दापोली
गुहागर- घरडा इन्स्टीट्यूट ॲण्ड टेक्नोलॉजी कॉलेज लवेल, खेड
चिपळूण- युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण
रत्नागिरी- डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन रत्नागिरी
राजापूर- आबासाहेब मराठे कॉलेज राजापूर