विश्वगुरू बनून परदेशात फिरणारे पंतप्रधान मोदी मणिपूरला का जात नाहीत? काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल

मणिपूरमध्ये भाजपला प्रचंड बहुमत मिळालं तरी मणिपूर का जळतंय असा सवाल काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी विचारला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरू बनून फिरतात पण ते मणिपूरला का जात नाही असेही रमेश म्हणाले.

एएनाय या वृत्तसंस्थेशी बोलताना जयराम रमेश म्हणाले की, 18 महिने झालेत. तीन मे 2023 पासून मणिपूर जळतंय. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत मिळालं होतं. 15 महिन्यातच मणिपूर जळायला लागलं. मणिपूर का जळतंय याची चौकशी करा. तुमचं डबल इंजिन सरकार आहे तर चौकशी करा. पण मणिपूरमध्ये हे डबल इंजिन सरकार नाही तर डबल गेम सरकार झाले आहे. एक गेम राज्यात खेळत आहेत तर एक केंद्रात खेळला जातोय. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी राष्ट्रपतींना मणिपूरबद्दल पत्र लिहिलं होतं. पण त्याला उत्तर म्हणून भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पत्र लिहिलं आहे. हा खोटारडे पणा असून मूळ मुद्द्यांपासून लक्ष विचलीत करण्यासाठी हे सुरू आहे असेही रमेश म्हणाले.

मणिपूरसंदर्भात जनता चार प्रश्न उपस्थित करत आहेत, पहिला प्रश्न 18 महिन्यात पंतप्रधान मोदी मणिपूरल का नाही गेले? पंतप्रधान नरेंद्र मोदी विश्वगुरू म्हणून संपूर्ण जगात फिरतात आणि मणिपूरला का जात नाहीत?  दुसरा प्रश्न 31 जुलै 2024 पासून पूर्ण वेळ राज्यपाल का नाही? आदिवासी महिलेला हटवून आसामच्या राज्यपालांकडे पार्ट टाईम राज्यपाल पद देण्यात आलं. तिसरा प्रश्न फक्त 20 ते 23 आमदारांचा या सरकारला पाठिंबा आहे. पक्षांनी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. भाजपच्याच 12-13 आमदारांनी मुख्यमंत्र्यांना दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. तरी मुख्यमंत्र खुर्चीवर आहेत. मुख्यमंत्र्यांना का अजूनही हटवले नाही? आणि चौथा प्रश्न पंतप्रधान मोदींनी मणिपूरची जबाबदारी गृहमंत्र्यांकडे ढकलली आहे. गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्र बिरेन सिंह यांच्या जुगलबंदी का सुरू आहे? ड्रग माफियांविरोधात कारवाई का केली नाही ? 18 महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे. 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. 60 हजार लोक विस्थापित झालेत. नड्डाजींनी या मुद्द्यांवर लक्ष दिले पाहिजे असेही रमेश यांनी नमूद केले.