गडबड होईल असा अंदाज, म्हणून आम्ही सतर्क राहू; नाना पटोले यांचे विधान

उद्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकींचा निकाल लागेल, यात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तसेच दुपारी चित्र स्पष्ट झाल्यानंतर संध्याकाळीच राज्यपालांकडे सत्तास्थापनेचं पत्र देऊ असेही पटोले म्हणाले.

मुंबईत पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, उद्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. यात कुठलीही गडबड होऊ नये म्हणून कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आम्ही निर्देश दिलेले आहेत. कारण गडबड झाली तर जिंकणारी निवडणूकही हरता येते हे आपण पाहिलंय. त्यामुळे संपूर्ण सतर्कतेने आम्ही मतमोजणीवर लक्ष ठेवू.

तसेच आमचे आमदार कुठेही जाणार नाहीत, जसा निकाल जाहीर होईल तसे आम्ही आमदारांना मुंबईत बोलवून घेऊ. 26 तारखेला या सरकारचा शेवटचा दिवस आहे. उद्या दुपारपर्यंत राज्याचे निकाल हाती येतील. निकाल आल्यानंतर तातडीने सर्व आमदारांच्या सह्या घेतल्या जातील आणि जमल्यास उद्याच रात्री राज्यपालांना पत्र देण्याची व्यवस्था करू असेही पटोले म्हणाले.