छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. घटनास्थळावरून एके 47, एसएलआरसह तीन स्वयंचलित बंदुका आणि अन्य शस्त्रे हस्तगत करण्यात आली आहेत.
ओडिशातून छत्तीसगडमध्ये गुरुवारी नक्षलवादी घुसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार सुरक्षा रक्षकांनी परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. यादरम्यान नक्षलवाद्यांनी भीज्जीमध्ये गोळीबार सुरू केला. यानंतर प्रत्युत्तरात जवानांनीही गोळीबार केला. यात 10 नक्षलवाद्यांचा खात्मा झाला, असे बस्तरचे आयजी पी सुंदरराज यांनी सांगितले.
कोराजुगुडा, दंतेसपुरम, नागराम आणि भांडारपदर गावांजवळील जंगलात ही चकमक झाली. डीआरजी आणि सीआरपीएफ टीमसोबत नक्षलवाद्यांची चकमक सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले.
याआधी, पाच दिवसांपूर्वी छत्तीसगडच्या कांकेरमध्ये जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यावेळी पोलिसांनी पाच नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्याच दिवशी बलरामपूरमध्ये रस्त्याच्या कडेला शोध मोहिमेदरम्यान सैनिकांनी सुमारे 4 किलो वजनाचा आयडी टिफिन बॉम्ब निकामी केला.