राजस्थानमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. मृत घोषित करत शवविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारासाठी नेत असताना व्यक्ती जिवंत असल्याचे उघड झाले. यानंतर एकच खळबळ उडाली. राजस्थानच्या झुंझुनूमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या तीन डॉक्टरांना निलंबित करण्यात आले आहे.
रोहिताश असे त्या व्यक्तीचे नाव असून तो अपंग आणि मतिमंद आहे. रोहितांश झुंझुनू येथील बग्गडमध्ये मां सेवा संस्थानमध्ये राहत होता. गुरुवारी सकाळी बेशुद्ध अवस्थेत त्याला शासकीय बीडीके रुग्णालयात उपचारासाठी आणले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर त्याचा मृतदेह शवागृहात हलवण्यात आला.
दोन तासांनंतर मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो अंत्यसंस्कारासाठी संस्थेच्या ताब्यात देण्यात आला, मात्र अंतिम संस्कारासाठी नेले जात असतानात मृत रोहिताश जिवंत झाला. रोहितशला तातडीने रुग्णालयात आणत आयसीयूमध्ये दाखल केले आहे.
घटनेची माहिती मिळताच शासनाकडून तहसीलदार व बगाड पोलीस ठाण्याचे अधिकारी यांना तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे फिरवलेले होते. जिल्हाधिकारी रामवतार मीणा यांनी हा निष्काळजीपणाचा गंभीर प्रकार असल्याचे सांगत संपूर्ण अहवाल आरोग्य विभागाला पाठवला आहे. यानंतर रात्री उशिरा शासनाने दोषी डॉक्टरांवर कारवाई केली.
तीन डॉक्टर निलंबित, विभागीय चौकशी सुरू
बीडीके रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप पाचर, डॉ. योगेश जाखर आणि डॉ. नवनीत मील यांना निलंबित करण्यात आले आहे. बीडीके रुग्णालयाच्या पीएमओसह तीन डॉक्टरांची विभागीय चौकशी सुरू आहे.