अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर अमेरिकेमध्ये लाचखोरी आणि फसवणुकीचे आरोप करण्यात आले. याचे पडसाद हिंदुस्थानच्या शेअर बाजारातही उमटले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत घसरण झाली. अदानी समूहाचे शेअर्सही 20 टक्क्यांपर्यंत पडले. आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशीही अदानींचे शेअर ‘लाल’ झाले आहेत. मात्र सेन्सेक्स-निफ्टी वधारले आहे.
मुंबई शेअर बाजाराचा 30 शेअरचा सेन्सेक्स 600 अकांनी वधारला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक 180 अकांनी वर गेला. काल सेन्सेक्स 77,155 वर क्लोज झाला होता. आज बाजार सुरू होताच तो 200 अकांनी वधारला आणि 77,349.74 वर गेला. त्यानंतर काही मिनिटात सेन्सेक्समध्ये 608 अकांची वाढ झाली आणि तो 77,764 वर पोहोचला. सेन्सेक्स पाठोपाठ निफ्टीही सुसाट निघाला आणि 1871.30 अंकांच्या वाढीसह 23,541.10 वर पोहोचला.
अदानी समूहाचे शेअर लाल
दरम्यान, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली असली तरी अदानी समूहाचे शेअर्स लाल आहेत. अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर 8.76 टक्के पडला आहे. तर अदानी पोर्टचा शेअर 4.09 टक्के, अदानी पॉवरचा शेअर 5.56 टक्के, अदानी टोटल गॅसचा शेअर 3.63 टक्के, अदानी एनर्जीचा शेअर 5.72 टक्के, अदानी विलमारचा शेअर 2.34 टक्के पडला. तर एसीसी, अंबुजा सिमेंट आणि एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये किरकोळ तेजी दिसली.