ठाण्याच्या शास्त्रीनगरात आरोग्य केंद्राचा भूखंड भूमाफियांनी गिळला

शास्त्रीनगर येथील ठाणे महापालिकेच्या आरोग्य केंद्राचा भूखंड भूमाफियांनी गिळायला सुरुवात केली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मोकळ्या भूखंडावर आणि विकास आराखड्यामध्ये आरक्षित असलेल्या रस्त्यावर भूमाफियांकडून बेकायदा गाळे बांधण्यात येत आहेत. याप्रकरणी वर्तकनगर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांकडे वारंवार तक्रार करूनही अतिक्रमणावर कारवाई होत नसल्याने शास्त्रीनगरवासीयांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शास्त्रीनगर हा विभाग कामगार वस्ती असलेला भाग आहे. येथील रहिवाशांना ठाणे महापालिकेच्या माध्यमातून चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ठाणे महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर आरोग्य केंद्र उभारण्यासाठी मंजुरी मिळाली आहे. मात्र हा भूखंडच आता भूमाफियांनी गिळंकृत करायला घेतला आहे, तर हत्तीपूलकडून शास्त्रीनगर नाक्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यालगत वनविभागाच्या भिंतीला लागून असलेल्या मोकळ्या जागेवर ज्येष्ठ नागरिक कट्टा उभारण्याचा प्रस्तावही मंजूर असताना आचारसंहिता असल्याने काम सुरू करण्यास होणाऱ्या दिरंगाईचा फायदा घेत भूमाफियांनी या जागाच बळकावल्या आहेत.

आरोग्य केंद्रांच्या जागेवर गाळे बांधण्यात आले आहेत, तर ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या जागेवर अनधिकृत बांधकाम उभारणीस सुरुवात झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे उपायुक्त, वर्तकनगर प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे तक्रारी करूनही अद्याप कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

या जागेवर विशेष निधीतून ज्येष्ठ नागरिक कट्टा आणि आरोग्य केंद्र उभारणीचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. तशी वर्कऑर्डरही निघाली आहे. याप्रकरणी सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले आहे. तसेच अतिक्रमण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून भूखंड मोकळा करण्याची मागणी आज स्थानिक नागरिकांनी केली आहे.