‘अश्लील रिल्स’चा भडीमार ठरतोय डोकेदुखी

लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक गेल्या काही वर्षांत सोशल मीडियावरील ‘रिल्स’च्या जाळ्यात चांगलेच अडकत चालले आहेत. तासन्तास रिल्स बघण्याची सवय अनेकांना जडली आहे. मात्र, लाईक्स आणि व्हिव्ज मिळवण्याच्या नादात सध्या शिवीगाळ किंवा अश्लील आशय असणाऱ्या रिल्सचा भडीमार सोशल मीडियावर सुरू आहे. लहान मुलेदेखील अशा अश्लील रिल्सच्या जाळ्यात अडकत चालली असून, त्याचा विपरित परिणाम त्यांच्या मानसिक, शारीरिक आरोग्यावर होत आहे.

आधुनिक युगामध्ये लहान मुलांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांच्याच हातामध्ये मोबाईल आला आहे. गेल्या काही वर्षांत इन्स्टाग्राम किंवा फेसबुकसारखे सोशल मीडिया अॅप वापरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे.

अशा अ‍ॅप्सवर शेअर केल्या जाणाऱ्या रिल्सला जितके जास्त लाईक किंवा व्हिव्ज मिळतात, त्यातून अनेकांना आर्थिक लाभ होत आहे. त्यामुळे आर्थिक स्रोत निर्माण व्हावा, या उद्देशाने रिल्स बनवणाऱ्या कलाकारांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. आरोग्य, क्रीडा, भ्रमंती, खाद्यपदार्थ, माहितीपर यांसह मनोरंजनाच्या विषयांवर आधारित असणाऱ्या रिल्सची संख्या अधिक आहे.

मात्र, गेल्या काही वर्षांत या रिल्सचे स्वरूप बदलू लागले आहे. अधिक लाईक्स किंवा फॉलोअर्स मिळवण्याच्या नादात अश्लील संवाद असणाऱ्या किंवा अश्लील आशय असणाऱ्या रिल्स बनवणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. अश्लील टिप्पणी करणे, अश्लील संवाद साधणे किंवा अश्लील हावभाव, अश्लील कपडे परिधान करून फोटो शेअर करणे, हिंदी किंवा इंग्रजी गीतांवर अश्लील नृत्य सादर करणे यांसह अन्य रिल्सचा भडीमार सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. इतर रिल्सच्या तुलनेत अशा रिल्स बघणाऱ्यांचे प्रमाण अधिक असून, अशा रिल्स मोठ्या प्रमाणावर शेअर केल्या जातात. चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाचे नियंत्रण असते. मात्र, सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या अशा रिल्सवर कोणाताही अंकुश नसल्याने अशा रिल्स सर्रास प्रदर्शित केल्या जात आहेत. त्यामुळे अशा रिल्सला कोण लगाम घालणार? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लहान मुलांवर काय होताहेत परिणाम?

मुलांना अगदी सहजपणे मोबाईल उपलब्ध होत असल्याने रिल्स बघणाऱ्या लहान मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशा अश्लील रिल्स बघितल्यामुळे मुलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत असून, सतत या रिल्स बघितल्यामुळे त्यांच्या शरीरावर, मनावर त्याचा परिणाम होत आहे. त्यातून ही मुले लहान वयातच ‘अर्ली मॅच्युअॅरिटी’ कडे जाऊ लागली आहेत. या रिल्स भडीमार होत असल्यामुळे योग्य काय? आणि अयोग्य काय? अशा संभ्रमात ही मुले पडत आहेत. त्यातूनच भविष्यातील धोके उद्भवत आहेत, असे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजेश अलोणे यांनी सांगितले.

काय घ्यायला हवी काळजी?

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या रिल्सवर कोणताही अंकुश नाही. त्यामुळे पालकांनीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. 12 वर्षांपर्यंत मुलांच्या हातामध्ये मोबाईल देऊ नये. ‘चाईल्ड लॉक’ करूनच मुलांना मोबाईल हाताळायला द्यावा. दिवसाचे काही तास ठरवून तेव्हाच मुलांना मोबाईल द्यावा. जास्त करून मुले एकांतामध्ये असताना अशा रिल्स बघतात. त्यामुळे चार-चौघांमध्येच मुलांना मोबाईल हाताळायला द्यावा, असे डॉ. अलोणे म्हणाले.