पिंपरीत मतदानाचा टक्का वाढला; तुतारी की घड्याळ उद्या फैसला

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये लढत होत असलेल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघात यंदा 51.78 टक्के मतदान झाले आहे. गतवेळीच्या तुलनेत यावेळी 25 हजार 379 अधिक मतदारांनी म्हणजेच 1.61 टक्क्यांनी मतदान वाढले. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याची उत्सुकता लागली आहे.

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे विद्यमान आमदार अण्णा बनसोडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुलक्षणा शिलवंत यांच्यासह 15 उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बुधवारी कैद झाले आहे. मात्र, खरी लढत बनसोडे आणि शिलवंत यांच्यातच झाली आहे.

वाढलेले मतदान कोणाच्या पारड्यात पडणार

पिंपरी मतदारसंघात 2 लाख 4 हजार 5 पुरुष, 1 लाख 87 हजार 568 महिला, तर 34 इतर असे 3 लाख 91 हजार 607 मतदार आहेत. यापैकी 1 लाख 5 हजार 397 पुरुष, 97 हजार 360 महिला, तर इतर 9 अशा 2 लाख 27 हजार 66 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे, तर 2109 मध्ये 97 हजार 83 पुरुष, 80 हजार 301 महिला आणि इतर 3 अशा 1 लाख 77 हजार 387 (50.17) मतदारांनी मतदान केले होते. गतवेळीच्या तुलनेत यावेळी 25 हजार 379 अधिक मतदारांनी मतदान केले आहे.

पिंपरी मतदारसंघ हा राखीव आहे. हा मतदारसंघ झोपडपट्टीबहुल असून, निगडी, प्राधिकरण, आकुर्डीसारखा मध्यम आणि उच्चभ्रू परिसर आहे. ? तसेच शहरातील मोठी बाजारपेठ असलेला पिंपरी कॅम्प, पिंपरी गावच्या परिसरात प्रामुख्याने प्राधिकरण, आकुर्डी भागात उत्साहात मतदान झाले आहे. या पट्ट्यात शिलवंत यांना अधिक मतदान झाल्याचे बोलले जात आहे, तर झोपडपट्टीबहुल भागातून आणि पिंपरी कॅम्पातून बनसोडे यांना चांगले मतदान झाल्याचा अंदाज आहे. यावेळी वाढलेले मतदान कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात पडणार, यावरच पिंपरीचा निकाल अवलंबून असणार आहे.

जिंकण्यासाठी 1 लाख मतांची आवश्यकता

पिंपरी मतदारसंघात 3 लाख 91 हजार 607 मतदारांपैकी 2 लाख 27 हजार 66 मतदारांनी मतदानाचा आपला हक्क बजावला आहे. त्यामुळे उमेदवाराला पिंपरी जिंकण्यासाठी 1 लाखांच्या पुढे मतदान घेणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.