India vs Australia – पर्थवर टीम इंडियाची प्रथम फलंदाजी; 2 खेळाडूंचं पदार्पण, संघात 3 विकेट किपर

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावसकर ट्रॉफीचा पहिला सामना पर्थवर खेळला जात आहे. रोहित शर्मा सुट्टीवर असल्याने टीम इंडियाचे नेतृत्व वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह करत आहे. त्याने पर्थच्या उसळी घेणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर टीम इंडियाचा 11 खेळाडूंचा संघही जाहीर करण्यात आला.

पर्थवर टीम इंडियाकडून दोन खेळाडू कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहेत. अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी आणि वेगवान गोलंदाज हर्षित राणा यांना पदार्पणाची संधी मिळाली आहे. संघातील सर्वात ज्येष्ठ खेळाडू विराट कोहली याने दोघांना कॅप दिली.

रोहित सुट्टीवर असल्याने केएल राहुल आणि यशस्वी जैस्वाल सलामीला येतील. त्यानंतर देवदत्त पड्डिकल तिसऱ्या, विराट कोहली चौथ्या, ऋषभ पंत पाचव्या आणि ध्रुव जुरेल सहाव्या स्थानावर फलंदाजीला येईल. तळाला वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी हे दोन अष्टपैलू खेळाडू आहेत. टीम इंडियाची फलंदाजी खोलवर असली तरी अनेक खेळाडू नवखे आहेत. त्यामुळे सर्व भिस्त केएल राहुल आणि विराट कोहलीवर आहे. तर गेल्या दौऱ्यात दमदार खेळी करणाऱ्या पंतच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल.

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर व्हाईटवॉश झाल्याने टीम इंडियाचे मनोधैर्य खचलेले आहे. त्यात कर्णधार रोहित शर्मा सुट्टीवर असून शुभमन गिल जायबंदी झालेला आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहला ताज्या दमाच्या खेळाडूंसह चमत्कार करून दाखवावा लागणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल सलग तिसऱ्यांदा खेळायची असेल तर टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकाविजय आवश्यक आहे.

हिंदुस्थानचे लक्ष्य – विजयाची हॅटट्रिक

न्यूझीलंडविरुद्धच्या दारुण पराभवाने हिंदुस्थानच्या जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीत धडक मारण्याच्या मार्गात काटे पेरले आहेत. हिंदुस्थानला आता ऑस्ट्रेलियाला पाचपैकी चार सामन्यांत हरवून एक कसोटी अनिर्णित राखावी लागणार आहे. हिंदुस्थानची सध्याची स्थिती पाहता ही अपेक्षा म्हणजे निव्वळ मूर्खपणाची लक्षणे आहेत. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्या मायभूमीत झालेल्या गेल्या दोन्ही मालिकेत 2-1, 2-1 असे मालिका विजय नोंदविले आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सलग तिसऱयांदा त्यांच्या घरच्याच खेळपट्टीवर हरवण्याचे हिंदुस्थानचे ध्येय आहे. तरीही हिंदुस्थानचे पर्थवर कसे पाऊल पडतेय, यावरच मालिकेचा पुढील निकाल अपेक्षित आहे.

हिंदुस्थानचा संघ – 

केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, देवदत्त पड्डिकल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी (डेब्यू), हर्षित राणा (डेब्यू), जसप्रीत बुमराह (कर्णधार) आणि मोहम्मद सिराज

ऑस्ट्रेलियाचा संघ –

नॅथन मॅकस्विनी, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लायन आणि जोश हेझलवूड