हिंदुस्थानी महिला संघाच्या वेगवान गोलंदाज झूलन गोस्वामीचे नाव ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर एका स्टॅण्डला दिले जाणार आहे. स्टेडियममधील बी ब्लॉकला झूलनचे नाव देण्याचा प्रस्ताव बंगाल क्रिकेट संघटनेच्या (कॅब) बैठकीत ठेवण्यात आला आहे. सर्व काही लवकर ठरले तर 22 जानेवारीला हिंदुस्थान आणि इंग्लंड यांच्यात होणाऱया टी-20 सामन्यात या स्टॅण्डचे अनावरण केले जाईल. झूलनने 12 कसोटी, 204 वन डे आणि 68 टी-20 सामन्यात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. तिने या तिन्ही फॉरमॅटमध्ये 355 विकेट टिपल्या असून आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट टिपण्याचा विक्रम तिच्याच नावावर कायम आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर आतापर्यंत हिंदुस्थानचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीसह पंकज रॉय, विश्वनाथ दत्त आणि जगमोहन दालमिया यांच्याही नावांनी स्टॅण्ड आहेत.