वीरूच्या पुत्राचाही झंझावात

हिंदुस्थानी संघाचा धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागचा पुत्र आर्यवीर सेहवागनेही प्रतिस्पर्धी संघाला फोडून काढताना चौकार-षटकारांची बरसात केली. कूच बिहार करंडक स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना आर्यवीरने मेघालयाच्या गोलंदाजांची यथेच्छ पिटाई करताना 229 चेंडूंत नाबाद 200 धावांची घणाघाती खेळी साकारली. त्याने या खेळीत 34 चौकार आणि 2 षटकारांची आतषबाजी केली.

कूच बिहार करंडकातील सामन्यात दिल्लीने मेघालयाचा पहिला डाव 260 धावांतच गुंडाळला. त्यानंतर 16 वर्षीय आर्यवीरने दणदणीत फटकेबाजी करताना दुसऱया दिवसअखेर आपल्या संघाला 2 बाद 468 अशी दमदार धावसंख्या उभारून देत 208 धावांची जबरदस्त आघाडीही मिळवून दिली. खेळ थांबला तेव्हा आर्यवीर 200 तर धान्या नावरा 98 धावांवर खेळत होते. पहिल्या विकेटसाठी आर्यवीरने अर्णक बग्गासह 180 धावांची सलामीही दिली. अर्णवनेही जोरदार शतक साजरे केले.

आर्यवीरने गेल्याच महिन्यात विनू मंकड करंडकात दिल्लीकडून पदार्पण केले होते. त्याने मणिपूरविरुद्ध खेळताना 49 धावांची खेळी करताना संघाला सहा विकेटनी विजय मिळलून दिला होता. सध्या आर्यवीर आयपीएलमध्ये स्थान मिळवण्यासाठीही धडपडत आहे. मात्र त्याला अजूनही संधी मिळालेली नाही. एकेकाळी रणजी खेळणारा हिंदुस्थानी संघात स्थान मिळवायचा. मात्र आता आयपीएलमध्ये यशस्वी ठरणारा खेळाडूच हिंदुस्थानी संघात सहज निवडला जात असल्यामुळे आर्यवीरही आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी उत्सुक असल्याचे वीरेंद्र सेहवागने गेल्याच मोसमाता सांगितले होते.