मुंबईत गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळण्यास सुरुवात झाली असून आगामी हिवाळय़ात हे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने पालिका सतर्क झाली आहे. यातच निवडणुकीच्या कामात गुंतलेली यंत्रणा पुढील आठवडय़ापासून मोकळी होणार असल्यामुळे आता प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांची झाडाझडती पुढच्या आठवडय़ापासून सुरू होणार आहे. यासाठी मंगळवारी पालिका प्रशासनाची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.
मुंबईत सद्यस्थितीत सुमारे पाच हजारांवर बांधकामे सुरू आहेत. या कामांमधून उडणारी धूळ हवेत टिकून राहत असल्यामुळे हवेचा दर्जा खालावत आहे, असे तज्ञांचे म्हणणे आहे. हिवाळय़ात आर्द्रता वाढल्यानंतर हे प्रमाण वाढत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे. गतवर्षी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे 23 ऑक्टोबर रोजी पालिकेकडून 27 प्रकारची नियमावली बांधकामांसाठी लागू करण्यात आली. यामध्ये या वर्षी दोन नियम वाढवण्यात आले असून बांधकामाच्या ठिकाणी शेकोटी पेटवण्यास आणि जेवण तयार करण्यासाठी धूर निर्माण करणारी चूल पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
अशी आहे नियमावली
- धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 20 ते 30 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन.
- संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे, बांधकामाच्या ठिकाणी प्रिंकलर असावेत, धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान चार-पाच वेळा पाण्याची फवारणी करावी, कामगारांना मास्क, चष्मा द्यावा.
- रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ऍण्टी स्मॉग मशीन लावावीत, प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी.
अशी होणार कारवाई
- नियमावलींची पाहणी करण्यात येणार
- पूर्तता करण्यासाठी नोटीस बजावणार
- नोटीसनंतरही कार्यवाही न झाल्यास ‘शो कॉज’ नोटीस
- यानंतर 15 दिवसांची नोटीस देऊन ‘स्टॉप वर्क’ नोटीस