पतीने केली पत्नीची टॉवेलने गळा आवळून हत्या, आरोपी पती गजाआड

चारित्र्यावर संशय आणि दागिन्यांवरून होणारा वाद 25 वर्षीय महिलेच्या जिवावर बेतला. वाद टोकाला गेला अन् पतीने टॉवेलने गळा आवळून पत्नीची हत्या केल्याची घटना घडली. याप्रकरणी मलबार हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी पतीला बेडय़ा ठोकल्या आहेत.

संगीता (25) असे मृत महिलेचे नाव होते. मलबार हिल येथील कंबाला हिल हायस्कूल शेजारी असलेल्या शिवाजी नगर येथे ती पतीसोबत राहत होती. पती-पत्नीमध्ये बुधवारी कडाक्याचे भांडण झाले. हा वाद टोकाला गेला आणि पतीने संगीताला  मारहाण केली. रागाच्या भरातच त्याने टॉवेलने संगीताचा गळा आवळला. तिला जवळच्याच इस्पितळात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली. संगीताचे दागिने पतीने मित्राकडे गहाण ठेवले होते. तसेच चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात वाद व्हायचे. बुधवारीही असाच वाद झाला.