‘बटेंगे तो कटेंगे’,‘व्होट जिहाद’चे नारे भाजपच्या अंगलट; राज्य निवडणूक आयोगाकडून केंद्रीय आयोगाला अहवाल

भाजप नेत्यांनी निवडणुकीच्या प्रचारात ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘व्होट जिहाद’, ‘एक है तो सेफ है’, ‘धर्मयुद्ध’ असे नारे आणि काही आक्षेपार्ह घोषणा दिल्या होत्या. राज्य निवडणूक आयोगाने या घोषणांची गंभीर दखल घेऊन यासंदर्भातील 15 अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवून दिले आहेत. या प्रकरणात आचारसंहिता भंग झाल्याच्या मुद्दय़ावरून केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महाराष्ट्रात देण्यात आलेल्या घोषणांची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने स्वतःहून मागवून घेतली आहे, तर काही आक्षेपार्ह घोषणांच्या संदर्भातील माहिती राज्य निवडणूक आयोगाने स्वतःहून केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवून दिली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महाराष्ट्रात झालेल्या निवडणूक प्रचारसभांमध्ये ‘बटेंगे तो कटेंगे’ ही दिलेली घोषणा सर्वात आक्षेपार्ह आहे. या घोषणेमुळे खळबळ माजली आहे. दोन सभांमध्ये योगी आदित्यनाथ यांनी ‘कटेंगे तो बटेंगे’ची घोषणा दिली होती, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मयुद्धाची घोषणा केली होती.

मुस्लिम धर्मगुरू सज्जाद नोमानी यांनी मतदानाबाबत केलेल्या कथित वक्तव्याबाबतचे अहवालही केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आले आहेत. निवडणूक प्रचारात देण्यात आलेल्या या आक्षेपार्ह घोषणांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी ज्येष्ठ विधिज्ञांकडून कायदेशीर मत तपासून घेणार आहे. या नेत्यांकडून देण्यात आलेल्या घोषणांबाबत या विधिज्ञांकडून अहवाल मागवण्यात येणार आहे.

चांदिवलीतील रोड शोमुळे एकनाथ शिंदे अडचणीत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी चांदिवलीत रोड शो केला आणि वरळीतही गेले. ठाण्यातील मतदान प्रक्रिया संपेपर्यंत ठाण्यातील निवासस्थानातून ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी जाऊ नका अशा सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. पण तरीही एकनाथ शिंदे ठाण्याहून निघाले. चांदिवलीत रोड शो केला आणि वरळीत गेले. रोड शोच्या विरोधात झालेल्या तक्रारीची निवडणूक आयोगाने चौकशी सुरू केली आहे.