इंधन चोरीमुळे पेट्रोलचे दर वाढतात, हायकोर्टाचे गंभीर निरीक्षण; आरोपीला नाकारला अटकपूर्व जामीन

इंधन चोरीमुळे पेट्रोलचे दर वाढतात. देशाची आर्थिक स्थिती ढासळते, असे गंभीर निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले आहे.

पेट्रोल चोरी प्रकरणातील आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळताना न्या. आर. एन. लढ्ढा यांनी पेट्रोल चोरीच्या गंभीर परिणामांवर भाष्य केले. पेट्रोल चोरीने कराद्वारे मिळणारा महसूल बुडतो, अवैध व्यापार वाढतो, असे न्यायालयाने नमूद केले.

13 लाख रुपयांचे पेट्रोल चोरले

मोहम्मद अहमद शफिक खानने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्हावा-शेवा येथील इंडियन ऍाईल कंपनीच्या पाईपलाईनमधून सुमारे 13 लाख रुपये किमतीचे तब्बल 13 हजार लिटर पेट्रोल चोरीचा मोहम्मदवर आरोप आहे. चोरीच्या पेट्रोलची टँकरने वाहतूक झाली. या गुह्यातील अटक टाळण्यासाठी मोहम्मदने न्यायालयाचे दार ठोठावले होते.

 आरोपीच्या वकिलाचा दावा

मोहम्मद घटनास्थळावर हजर नव्हता. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. सहआरोपीच्या जबाबाच्या आधारावर मोहम्मदला या गुह्यात गोवले. सहआरोपीला जामीन मंजूर झाला आहे. मोहम्मदला अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी मागणी ऍड. संदीप वाघमारे यांनी केली.

पोलिसांचा विरोध

मोहम्मद व त्याचे वडील फरार आहेत. ते पेट्रोल चोरीचे खरे सूत्रधार आहेत. त्यांची कोठडीत चौकशी होणे आवश्यक आहे. मोहम्मदचा अटकपूर्व जामीन फेटाळावा, असा युक्तिवाद न्हावा- शेवा पोलिसांकडून सरकारी वकील अमित पालकर यांनी केला.

पेट्रोल स्वस्तात विकले

चोरीचे पेट्रोल स्वस्तात विकण्यात आले. पेट्रोल चोरीच्या रॅकेटचा शोध घेण्यासाठी मोहम्मदची चौकशी होणे आवश्यक आहे, असेही न्या. लढ्ढा यांनी स्पष्ट केले.