मतदानाचा वाढलेला टक्का… महायुतीला धक्का! महाराष्ट्रात विक्रमी मतदान

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मतदारांनी भरभरून मतदान केले. राज्यात एकूण 65 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले, तर मुंबईत सरासरी 55 टक्के मतदान झाले. 30 वर्षांनंतर प्रथमच इतके विक्रमी मतदान झाले. इतक्या मोठय़ा प्रमाणात मतदार मतदानासाठी उतरतात तेव्हा ते सत्ताधाऱ्यांविरुद्ध मतदान असते असा देशातीलच नव्हे तर जगातील निवडणुकांचा इतिहास आहे. हेच जास्तीचे मतदान महाराष्ट्रात सत्तांतर घडवणार असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यात 61.29 टक्के मतदान झाले होते, तर मागील विधानसभा निवडणुकीत राज्यात 61 टक्के मतदानाची नोंद झाली होती. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत ती टक्केवारी आणखी वाढली. सत्तांतराचेच हे संकेत असल्याचे सांगितले जाते.

13 कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्रात निवडणूक आयोगाच्या आकडेवारीप्रमाणे 9 कोटी 59 लाख नोंदणीकृत मतदार आहेत. त्यात पुरुष मतदारांची संख्या 4 कोटी 59 लाख आणि महिला मतदारांची संख्या 4 कोटी 64 लाख इतकी आहे. तृतीयपंथीय मतदारांची संख्या सहा हजार आहे. 9 कोटी 59 लाख मतदारांपैकी 65 टक्क्यांहून अधिक म्हणजेच सुमारे पाच कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

2014 च्या विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी 2009 पेक्षा चार टक्क्यांनी वाढली होती. त्यानंतर राज्यात सरकार बदलले. 2014 मध्ये 63.38 टक्के मतदान झाले होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मागे टाकून भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने अनुक्रमे 125 आणि 63 जागा जिंकत बहुमताचे सरकार बनवले होते. त्यापूर्वी 1995 च्या निवडणुकीत राज्यात विक्रमी मतदान झाले होते. 71.69 टक्के मतदान झाले होते आणि महाराष्ट्रात प्रथमच गैरकाँग्रेसी सरकार बनले होते. त्यामुळे यंदा वाढलेले मतदान हे मतदारांनी महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला कौल असावा अशी चर्चा सुरू आहे.

टक्का वाढल्याची कारणे

महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाल्याने सरकारविरुद्ध निर्माण झालेला संताप

गद्दारीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल लोकांमध्ये वाढलेली सहानुभूती

भाजप आणि मोदी सरकारबद्दल देशभरात असलेले विरोधी वातावरण

‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ अशा भाजपच्या घोषणांविरुद्ध महाविकास आघाडीने केलेला जोरदार प्रचार

शनिवार, रविवार असा सुट्टीला जोडून मतदानाचा दिवस नसल्याने लोक फिरायला न जाता मतदानाला उतरले