जम्मू कश्मीरमध्ये कामगारांवर सातत्याने हल्ले होत आहेत. दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये चकमकी होत असून जवान शहीद होत आहेत. या पार्श्वभूमीवर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱयांच्या घरावर एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून छापेमारी सुरू करण्यात आली आहे. दहशतवाद्यांना आश्रय देणारे तसेच मदत करणाऱयांना कठोर शिक्षेसोबतच त्यांच्या मालमत्ताही गमवाव्या लागू शकतात.
एनआयएने दहशतवाद्यांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी जम्मू-कश्मीर पोलिस आणि इतर सुरक्षा दलांच्या सहकार्याने विशेष संयुक्त मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार पाकिस्तानातून घुसखोरी करून हिंदुस्थानात येणाऱया दहशतवाद्यांना आश्रय धेणाऱयांची मालमत्ता जप्त केली जाणार आहे. बाहेरून नोकरीसाठी जम्मू-कश्मीरमध्ये आलेल्या लोकांना लक्ष्य केल्या जाणाऱया हल्ल्यांत सहभागी असणाऱयांवरही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एनआयएने या मोहिमेअंतर्गत यंदाच्याच फेब्रुवारीत श्रीनगरच्या शाला कदर भागात दोघांच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असलेला लश्करचा दहशतवादी आदिल मंजूर लंगूची श्रीनगरच्या जलदागर येथील मालमत्ता यूएपीए कायदा 1967 च्या कलम 25 अंतर्गत जप्त केली. तसेच दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि त्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली 4 जणांची मालमत्ता जप्त केली गेली.
– जम्मू-कश्मीर पोलिसांनी उत्तर कश्मीरच्या हंदवाडा येथील सुपनगामा येथील रहिवासी अर्शद अहमद परे, पालपोराचा दहशतवादी सज्जाद अहमद बट या दहशतवाद्यांच्या हँडलर्सच्या मालमत्तांवर कारवाई केली. एनआयने त्यांची 10 कोटी रुपये किमतीची जमीन जप्त केली. दरम्यान, जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी गेल्या काही महिन्यांत पुन्हा घुसखोरीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांना रोखण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली आहेत.
– गेल्याच महिन्यात राज्यपालांनी दहशतवाद्यांना आश्रय देणाऱयांची घरे जमीनदोस्त करण्याचा इशारा दिला होता.