राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीची हवा अति धोकादायक पातळीवर पोहोचली असून दिल्ली शहर हे जगातील सर्वात जास्त प्रदूषित शहर आहे, तर पहिल्या दहा प्रदूषित शहरांमध्ये हिंदुस्थानातील आठ शहरांचा समावेश आहे. बुधवारी दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक 438 वर गेला होता. हवेत 2.5 मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण 291, तर 10 मायक्रॉनच्या प्रदूषकांचे प्रमाण 413, कार्बन मोनोऑक्साईडचे प्रमाण 1229 पीपीबी, सल्फर डायऑक्साईचे प्रमाण 5 पीपीबी, नायट्रोजन ऑक्साईडचे प्रमाण 28 पीपीबी, ओझोन 10 पीपीबी होते. दिल्लीनंतर दुसऱया क्रमांकावर उत्तर प्रदेशातील हापूर (हापुड) असून, हवा गुणवत्ता निर्देशांक 422 होता. तिसऱया क्रमांकावर चीनच्या हेलॉन्गजियांग प्रांतातील दकिंग शहर आहे.
दाट धुक्यामुळे हवा बिघडली
गेल्या आठवडाभरापासून दिल्लीसह उत्तर भारतात थंडी आणि दाट धुके पडत आहे. त्यामुळे या ठिकाणची हवा बिघडली आहे. हवेची घनता जास्त असल्यामुळे दहा मायक्रॉनच्या वरील प्रदूषित कणही जमिनीवर लवकर पडत नाहीत.
जगातील पहिल्या दहा सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये हिंदुस्थानातील आठ शहरांचा समावेश आहे. यात नवी दिल्ली – 438, हापूर (उत्तर प्रदेश) – 430, भिवानी (हरयाणा) 404, गुरुग्राम (हरयाणा) 383, गाझियाबाद (उत्तर प्रदेश) – 365, सोनीपत (हरयाणा) 351, मेरठ (उत्तर प्रदेश) 351, नोएडा (उत्तर प्रदेश) 341 या शहरांचा समावेश आहे.