एका व्यक्तीने दुसऱया व्यक्तीचे अपहरण केल्याचे आपण ऐकतो, मात्र कधी एका रोबोटने दुसऱया रोबोटचे अपहरण केल्याचे तुम्ही ऐकलंय का? होय, चीनमध्ये अशी घटना घडली आहे. एका एआय रोबोटने दुसऱया कंपनीच्या शोरूममध्ये घुसून एक-दोन नव्हे, तर 12 रोबोटचे अपहरण केले. हा सगळा प्रकार शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱयामध्ये कैद झाला. या घटनेमुळे पुन्हा एकदा एआय तंत्रज्ञानाच्या गैरवापराची चिंता वाढली आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आलंय की, शांघाई रोबोटिक्स कंपनीच्या शोरूममध्ये ‘इरबाई’ नावाचा छोटा रोबोट अन्य मोठय़ा रोबोटसोबत बोलताना दिसत आहे. छोटा रोबोट सगळय़ांना, तुम्ही किती तास काम करता? तुम्ही घरी जात नाही का? असे विचारतो त्यावर मोठा रोबोट म्हणतो, मला घर नाही. यानंतर छोटा रोबोट सर्वांना आपल्यासोबत घरी चला असे सांगतो. त्यानंतर सगळे एकामागून एक शोरूमच्या बाहेर जाताना दिसतात. सुरुवातीला हा व्हिडीओ फेक वाटत होता, मात्र रोबोट बनवणाऱया दोन्ही कंपन्यांनी व्हिडीओ खरा असल्याचे सांगितले.